रायपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लोकांना घरामध्ये राहण्यास सांगण्यात येत आहे. मात्र बसून राहिलं, तर घरात चूल कशी पेटणार असा प्रश्न हातावर पोट असणाऱ्या सर्वांनाच पडला आहे. देशात भाजी विक्री सुरू आहे, मात्र त्यासाठी ठराविक वेळच परवानगी देण्यात आली आहे. या वेळेतच लहान लहान भाजीविक्रेत्यांना भाजी घेऊन, ती विकून घरी जावे लागते. दिलेल्या वेळेत भाजी विकली गेली नाही, तर जेवढी विक्री झाली आहे त्यावरच समाधान मानत नुकसान सोसावे लागते.
छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यामध्येही अशीच एक महिला भाजी विक्रीसाठी रस्त्यावर बसली होती. नेमका त्याचवेळी पोलिसांचा फ्लॅग मार्च सुरू झाला, आणि सर्वांना रस्ता मोकळा करण्यास सांगण्यात आले. काही भाजीविक्रेते पोलिसांना पाहून निघून गेले. मात्र या महिलेने भाजीची विक्री झाल्याशिवाय आपण इथून जाणार नसल्याचा पवित्रा घेतला. फ्लॅग मार्च करत जिल्ह्याधिकारी अंकित आनंद आणि पोलीस अधिक्षक अजय यादव हे इतर पोलिसांसह या महिलेकडे आले, तेव्हा ती महिला घाबरून गेली.
जिल्हाधिकारी अंकित आनंद यांनी या महिलेला समजाऊन सांगितले, की कोरोनामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्हाला घरामध्ये रहावे लागेल, तुम्ही इथे भाजी विकू शकत नाही. त्यानंतर ती महिला निराश झाली, कारण तिच्याजवळची भरपूर भाजी शिल्लक होती. हे सर्व नुकसान आपल्याला सोसावे लागणार याची चिंता आणि भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. ते पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशातून दोनशे रुपये तिला देत, तिच्याजवळची शिल्लक राहिलेली सर्व भाजी विकत घेतली. "आता तरी तुमच्या जवळची सर्व भाजी संपली आहे, आता तुम्ही घरी जावा आणि घरातून बाहेर पडू नका", असे आनंद यांनी त्या महिलेला सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सगळी भाजी विकत घेतल्याचे पाहून त्या महिलेला फार आनंद झाला. तिने वारंवार त्यांचे आभार मानले. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले हे काम पाहून आजूबाजूच्या पोलिसांनीही टाळ्या वाजवत त्यांचे कौतुक केले.
हेही वाचा : प्रकृती ठीक असल्याचे अमित शाहांनी केले स्पष्ट; 'हितचिंतकां'साठी दिला खास संदेश..