मुंबई - शहरात गेल्या ५ दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने आगामी २ दिवसांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा जलमय होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुंबईत कालपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर आज (मंगळवार) काही काळ ओसरला होता. तरीही काही सखल भागात पाण्याचा निचरा अद्यापही झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी जलमय परिस्थिती झालेली आहे. विक्रोळी पूर्वेकडील काही परिसरात मोठ्या प्रमाणावर रात्रीपासून पाणी साचलेले आहे. पावसाचे पाणी रुळांवर साचल्यामुळे लोकलसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. काही रेल्वे स्थानकांवरती प्रवाशी रात्रीपासून अडकून पडले आहेत. रस्त्यांवरही पाणी साचल्यामुळे रिक्षा आणि बसही मिळत नाही. त्यामुळे, नागरिकांना पाण्यातून पायी जावे लागत आहे.
मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना सुचना देताना महत्वाचे काम असेल तर घराबाहेर पडा, असा सल्ला दिला आहे. हवामान खात्याकडूनही ४८ तासात मुसळधार पाऊस होण्याच्या अंदाज वर्तवला आहे. यामुळे मुंबईतील सरकारी कार्यालये बंद करण्यात आली आहेत.