बेळगाव - एका व्यक्तीच्या निधनानंतर अंत्यविधीला एकही नातेवाईक हजर झाला नाही. यानंतर चक्क मृत व्यक्तीच्या पत्नी आणि मुलाने एका व्यक्तिच्या सहाय्याने हातगाडीवर मृतदेह अंत्यविधीसाठी नेला. ही घटना अथणी येथे घडली. हा मृतदेह घेऊन जात असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर ही धक्कादायक घटना समोर आली. ही घटना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांच्या क्षेत्रात घडली.
सदाशिव हिरट्टी असे मृताचे नाव आहे. ते मागील 10 ते 12 दिवसांपासून आजारी होते. दरम्यान, काल (शुक्रवारी) त्यांचे निधन झाले. यानंतर त्यांच्या पत्त्नीने आपल्या पतीच्या निधनाची बातमी सर्व नातेवाईकांना दिली. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाच्या नावाखाली एकही नातेवाईक, सगासोयरा अंत्यविधीसाठी आला नाही. यानंतर त्या महिलेने आपल्या मुलासोबत एका व्यक्तीला बोलावून चक्क हातगाडीवर मृतदेह ठेवून अंत्यविधीसाठी नेला. हा मृतदेह घेऊन जात असताना काही लोकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एकीकडे कोरोनाचे महासंकट असताना नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. स्वत:साठी बाजारात जात आहेत. खरेदी करत आहेत. रस्त्यांवरती फिरत आहेत. मात्र, स्वत:च्या नातेवाईकाच्या अंत्यविधीला जाण्यासाठी त्यांना कोरोनाची भीती वाटत आहे. बेळगावमधील धक्कादायक प्रकारानंतर पुन्हा एकदा माणुसकी मेल्याचे समोर आले आहे.