हैदराबाद - आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण मंडळा(आयएनसीबी)च्या २००७मधील अहवालानुसार, अमली पदार्थांच्या वापरात किंवा व्यवहारात प्रसिद्ध व्यक्तींच्या सहभागाचा समाज जीवनावर मोठा परिणाम होतो. समाजातील एक मोठा गट प्रसिद्ध व्यक्तींचे विविध गोष्टींसाठी अनुकरण करतो. मात्र, जगभरातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती अमली पदार्थांच्या अधिन झालेले दिसतात.
अमली पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात घातक ठरते. तरीही जगभरात अमली पदार्थांचा छुपा व्यापार सर्रास चालतो. 'ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी' च्या अहवालानुसार अमली पदार्थांच्या अतिरेकी वापरामुळे २०१७ या वर्षीत ७ लाख ५० हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. ही संख्या खूनांच्या संख्येपेक्षा जवळपास दुप्पट आहे. भारतात २०१७मध्ये २२ हजार मृत्यू हे अमली पदार्थांच्या सेवनामुळे झाले आहेत.
अमली पदार्थांचे सेवन अकाली मृत्यूला कारणीभूत ठरते. अमली पदार्थांच्या सेवनामुळे वर्षाला सरासरी ५ लाख ८५ हजार अकाली मृत्यू होतात. अकाली मृत्यू होणाऱ्यांमधील ८० टक्के लोकांचा अमली पदार्थांशी संबंध आलेला आहे. अमली पदार्थांच्या सेवनामुळे अपघात, आत्महत्या, यकृताचे आजार, कर्करोग, एचआयव्ही होण्याचे प्रमाणही जास्त आहे.
याबाबत भारताचा विचार केला तर प्रामुख्याने चित्रपटसृष्टीतील कलाकार अमली पदार्थांच्या प्रकरणांमध्ये अडकल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या तपासात अमली पदार्थांचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. अभिनेत्री रिया तर चक्रवर्तीला या प्रकरणात एनसीबीने ताब्यातही घेतले आहे.
अमली पदार्थांच्या आहारी गेलेले बॉलिवूडमधील १० कलाकार -
१) संजय दत्त - अभिनेता संजय दत्त एकेकाळी पूर्णपणे अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. १९८२मध्ये त्याला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटकही करण्यात आली होती. त्यानंतर त्याला त्याच्या वडिलांच्या सल्ल्याप्रमाणे पोलिसांनी अमेरिकेतील सुधारगृहात पाठण्यात आले होते. तेव्हापासून संजय दत्त सर्व व्यसनांमधून बाहेर पडला आहे. संजय दत्तने अनेक सार्वजनिक ठिकाणी आपल्या अमली पदार्थ सेवनाच्या सवयीबद्दल आणि त्यानंतर जीवनात झालेल्या बदलांबद्दल सांगितले आहे. त्याच्या चरित्रपटामध्ये(संजू)ही ही बाब दाखवण्यात आली आहे.
२) पूजा भट - अभिनेत्री पूजा भट ही वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच व्यसनांच्या आहारी गेली होती. आपण अमर्याद दारू प्यायचो असे स्वत: पूजाने सांगितले आहे. त्यानंतर मात्र, ती व्यसनांमधून बाहेर पडली. आता ती व्यसनविरोधी अनेक सकारात्मक माहिती आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवताना दिसते.
३) रणबीर कपूर - रॉकस्टारफेम अभिनेता रणबीर कपूर एकेकाळी गांजाच्या अधिन झाला होता. अॅक्टींग स्कूलमध्ये असताना तो दररोज न चुकता गांजाचे सेवन करत असल्याचे रणबीरने स्वत: सांगितले आहे. रॉकस्टार चित्रपटाच्यावेळीही त्याने अभिनय एकदम सत्य वाटावा यासाठी अमली पदार्थ घेतल्याचे कबुल केले आहे.
४) मनिषा कोयराला - मूळची नेपाळची असलेली अभिनेत्री मनिषा कोयराला हिने आपल्या 'हिल्ड' या पुस्तकात स्वत:च्या व्यसनांबद्दल लिहिले आहे. करियरच्या सुरुवातीच्या काळात ती मोठ्या प्रमाणात दारुचे सेवन करत होती. मात्र, कर्करोग झाल्यानंतर आपले पूर्ण आयुष्यच बदलून गेले. चुकीच्या गोष्टींची निवड आपल्या आयुष्यावर खूप परिणाम करतात, असे मणिषा सांगते.
५) यो यो हनी सिंग - गायक आणि रॅपर हनी सिंग त्याच्या रॉकस्टार जीवनशैलीसाठी ओळखला जातो. एकेकाळी तोही पूर्णपणे दारुच्या आहारी गेला होता. त्याने आपल्या वाईट सवयींबद्दल मान्य केले आहे. मात्र, वेळीच योग्य मदत मिळाल्याने आपण वाईट सवयींमधून बाहेर पडलो, असे हनी सिंग सांगतो.
६) फरदीन खान - अभिनेता फरदीन खान याला २००१मध्ये अमली पदार्थ बाळगल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यालाही काही काळ सुधारगृहामध्ये ठेवण्यात आले. पुढे न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली होती. मात्र, त्याच्या अटकेचे प्रकरण त्यावेळी चांगलेच गाजले होते.
७) प्रतिक बब्बर - अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतिक याने २००८मध्ये 'धोबीघाट' या चित्रपटातून आश्वासक पदार्पण केले. त्यानंतर मात्र, तो व्यसनांच्या विळख्यात अडकला. आपले व्यसनांकडे वळणे ही गोष्टच करियरसाठी सर्वात घातक ठरल्याचे प्रतिक सांगतो.
८) परवीन बाबी - अभिनेत्री परवीन बाबी कायम आपल्या वादग्रस्त आयुष्यासाठी चर्चेत राहिली आहे. तिच्या अकाली मृत्यूनंतरही तिच्याबाबात अनेक गोष्टी चर्चिल्या गेल्या. असे म्हटले जाते की, महेश भट सोबत तिचे नाते तुटल्यानंतर ती लाइसरिक अॅसिड डायथॅलामाइड(एलएसडी) या अमली पदार्थाच्या अधिन गेली होती.
९) राहूल महाजन - माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांचा मुलगा राहूल महाजन हा देखील कायम वाईट गोष्टींसाठी चर्चेत राहिला आहे. पत्नीला मारहाण करण्यापासून तर कोकोनचे अतिसेवन केल्याप्रकरणी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.
१०) ममता कुलकर्णी - २०१६ मध्ये उघडकीस आलेल्या एका ड्रग्ज रॅकेटमध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णीचे नाव समोर आले. तिला न्यायालयाने फरारी घोषित केले आहे. असे म्हटले जाते की, ममताने तिच्या ड्रग माफिया पती विकी गोस्वामीसह केनियातील मोम्बासामध्ये आसरा घेतला आहे.
भारत आणि अमली पदार्थांचा वापर -
२००८मधील माहितीनुसार देशात २.३ कोटी नागरिक अफू, हेरॉईन, कोकेन, ब्राऊन शुगरचे सेवन करत असल्याचे समोर आले. हाच आकडा २००४मध्ये २.५ लाख होता. म्हणजे १४ वर्षांत यामध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे. देशातील ३.१ कोटी नागरिक म्हणजेच २.८ टक्के लोकसंख्या गांजा, चरस आणि अफूचे सेवन करते. तर १.२ टक्के लोक हाशीमचे अतिसेवन करतात. देशात अफूचे सामान्य प्रमाणात सेवन करण्यास परवानगी आहे मात्र, हाशीमचे सेवन बेकायदेशीर आहे.
उत्तर प्रदेश, पंजाब, सिक्कीम, छत्तीसगड आणि दिल्ली या ठिकाणी मोठ्याप्रमाणात गांजाचे सेवन केले जाते. जगाचा विचार केला तर बेकायदेशीर गांजा सेवनामध्ये भारताचा वाटा एक तृतीयांशापेक्षा कमी आहे. मात्र, हेच प्रमाण अफू आणि ओपीयड सेवनामध्ये खूपच जास्त आहे.
अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम -
- अमली पदार्थांच्या सेवनाने व्यक्तिच्या मानसिक आरोग्यावर अनेक घातक परिणाम होतात. अस्वस्थता, मानसिक तणाव यासारख्या व्याधी होतात.
- काही अमली पदार्थ खूप महागडे असतात मात्र, त्याचे व्यसन लागल्यानंतर ते कुठल्याही परिस्थितीत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात. यातून व्यक्ती दिवाळखोरीत येऊ शकतो. काही वेळा व्यक्तिकडून चोरी, खून यासारखे गुन्हेही घडतात.
- अमली पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्तीच्या वागण्यामध्ये, कौटुंबिक संबधांवर परिणाम होतात. व्यक्तीचे सामाजिक जीवनही पूर्णपणे उद्ध्वस्त होते.
- अमली पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्तीच्या गाडी चालवण्याच्या सवयीवर परिणाम होतो. व्यसनी लोकांमुळे अपघात झाल्याच्या शेकडो घटना घडलेल्या आहेत.