डेहराडून (उत्तराखंड) - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, एकाच वेळी सुरक्षित अंतर राखणे आणि सॅनिटायजेशनचे नियम पाळणे कठीण होत आहे. यावर उपाय म्हणून 'डीआरडीओ'चे शास्त्रज्ञ शब्बीर अहमद यांनी पायाने चालवले जाणारे 'हॅन्डवॉश युनिट' विकसित केले आहे.
लोकांना सध्या सुरक्षित अंतर राखण्याचे आणि कोणत्याही वस्तूंना स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करताना अनेकांचा हात त्याला लागत असतो. त्याद्वारेही संसर्ग होण्याची भीती असते. यावर उपाय म्हणून पायाने 'पँडल' मारल्यानंतर हातात सॅनिटायझर पडेल, असे सॅनिटायझर युनिट बनवण्याची संकल्पना डोक्यात आली आणि त्याद्वारे हे युनिट बनवले, असे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना शब्बीर यांनी सांगितले.
अशा प्रकारचे युनिट बाजारात उपलब्ध असले तरी हाताळायला हा अधिक सोपा युनिट असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याचे वजन केवळ 25 किलो असल्याने एक, दोन व्यक्ती त्याला सहज वाहून नेऊ शकतात. शिवाय विजेची गरज नसल्याने वापरताना जास्त खर्च येत नाही. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना ते प्रथम वापरण्यास देण्याची इच्छा असल्याचे शब्बीर म्हणाले.