रतलाम - 'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' मानणाऱ्या रतलामच्या ८२ वर्षीय डॉ. लीला जोशी 'मदर तेरेसा ऑफ माळवा' म्हणून सर्वपरिचित आहेत. आदिवासी भागातील महिलांमधील अशक्तपणासह इतर आरोग्य समस्या दूर करण्यासाठी त्या अविरत झटतायत. या रुग्ण सेवेची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना 'पद्मश्री' पुरस्कार घोषित केला आहे. आरोग्य क्षेत्रातील विशेषत: महिलांच्या आरोग्याबाबत त्यांनी केलेले कार्य जाणून घेण्याचा 'ईटीव्ही भारत'ने प्रयत्न केला आहे.
महिलांमधील अशक्तपणा (रक्ताची कमतरता) या रोगाशी सामना करण्यासाठी डॉ. जोशींनी एक अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत त्या अशक्तपणाने ग्रस्त महिलांना मोफत उपचार तर देतातच. शिवाय, या रोगासंदर्भात जनजागृतीदेखील करतात.
१९९७ साली डॉ. जोशी यांनी मदर तेरेसा यांची भेट घेतली होती. मदर तेरेसा यांच्या कार्याने प्रभावित होऊन डॉ. जोशींनी अशक्तपणाग्रस्त महिलांसाठी एक छावणी उभारून त्यांच्यावर मोफत उपचार करणे सुरू केले. हे अथक प्रयत्न आणि योगदानाची दखल महिला आणि बाल कल्याण विभागाने घेऊन २०१५ साली त्यांचा १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश करण्यात आला. त्यानंतर यावर्षीचा म्हणजेच २०२० चा 'पद्मश्री' त्यांना जाहीर झाला.
'सरकारी योजनांची योग्य अंमलबजावणी व्हावी'
सरकार लोक कल्याणासाठी बऱ्याच योजना बनवत असते. मात्र, त्यांची योग्य अंमलबजावणी होत नाही, असे स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. लीला जोशी सांगतात. हे टाळण्यासाठी त्यांनी निकालाभिमुख योजनांची निर्मिती आणि अंमलबजावणीबाबत सुचवले आहे. सधन वर्गाने या समाज कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन त्या करतात.
'महिलांनी स्वत:च्या प्रकृतीकडेही लक्ष द्यावे'
महिलांनी फक्त कुटुंबाचीच नाही, तर स्वत:चीही काळजी घ्यावी. शिवाय आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक उपायही अवलंबिले पाहिजे, असे त्या सांगतात. मुलींचे भविष्य चांगले आणि निरोगी राहण्यासाठी त्यांना योग्य पोषण दिले गेले पाहिजे, असा सल्लाही त्या देतात.