लखनौ - उन्नाव बलात्कार पीडित कुटुंबाच्या कारला धडक दिलेल्या ट्रकचा मालक दैवैंद्र किशोर पाल याने आरोपी भाजपचे आमदार कुलदीपसिंग सेंगर यांना ओळखत नसल्याचं म्हटले आहे.
२८ जुलै रोजी रायबरेलीवरुन माघारी येत असताना पीडितेच्या गाडीचा आणि ट्रकचा अपघात झाला होता. हा अपघाच नसून घातपात असल्याचा संशय आहे. या अपघातात पीडित मुलगी आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले होते, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताप्रकरणी दैवैंद्र किशोर पाल याला लखनऊ येथील सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
"माझा भाजप आमदार किंवा त्यांच्या लोकांशी कोणताही संबंध नाही, अपघाताचे कोणतेही षडयंत्र नव्हते. मला गाडीमध्ये प्रवास करणाऱयाविषयी काहीही माहिती नाही. पाऊस पडत होता. त्यामुळे वाहनाने संतुलन गमावल्याने ते गाडीला धडकले. तो फक्त एक अपघात होता, असे पाल याने म्हटले आहे.
मी ट्रक हप्त्यांवर घेतला होता. ट्रकचे हप्ते जमा केले नव्हते. त्यामुळे मला वाहन जप्तीची नोटीस आली होती. पोलिसांकडून पकडले जाणे टाळण्यासाठी आणि दंड भरावा लागू नये म्हणून मी नंबर प्लेट काळी केली होती, असे पाल यांनी सांगितले आहे. माझ्याकडे थकबाकी हप्त्यांच्या नोटिसा असून मी त्या दाखवेन असे त्याने म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
देशभर गाजलेल्या उन्नाव सामूहिक बलात्कार घटनेतील पीडिता आणि तिचे कुटुंब रायबरेली येथील कारागृहात बंद असलेल्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी जात होते. त्यावेली त्यांच्या कारला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात पीडितेची काकू आणि मावशीचा जागीच मृत्यू झाला. यापैकी पीडितेची काकू ही या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होती. तर, वकिलाची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपी कुलदीप सेंगर सध्या तुरुंगात असून तो तेथूनच आपल्या आणि आपल्या मुलीभोवती हे संपूर्ण कारस्थान रचत असल्याचे पीडितेच्या आईने म्हटले आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश धर्मेश शर्मा यांना उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीची जबाबदारी सोपवली आहे. याचबरोबर केंद्रीय अन्वेषण पथकाने (सीबीआय) आरोपी भाजपचा आमदार कुलदीप सेनगर याचे घरी आणि इतर १५ ठिकाणी छापा मारला आहे. लखनऊ, उन्नाव, बंदा आणि फतेहपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे.