जयपूर - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्थलांतरीत मजूरांना पायी चालत माघारी जाऊ नका, असे आवाहन केले आहे. सरकारने तुमच्या प्रवासासाठी व्यवस्था केली असून तुम्हाला गावी सोडण्यात येईल, असे मजूरांना आश्वस्त केले आहे. मात्र, हजारो मजूर पायी चालत आपआपल्या गावी जीव धोक्यात घालून निघाले आहेत.
पायी जाणाऱ्या मजूरांच्या खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना केले आहेत. स्थलांतरीत कामगारांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कामगारांना बस, आणि रेल्वेद्वारे मुळे गावी पाठविण्यात येण्याची व्यवस्था करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
मजूरांसाठी ई -पासची सुविधा करण्यात येणार
ज्या स्थलांतरीत मजूरांनी माघारी जाण्यासाठी नोंदणी केली आहे. त्यांना ई-पास देण्यात येणार आहे. तसेच वैद्यकीय आणि इतर अत्यावश्यक प्रवासासाठी अधिकाऱ्यांनी संवदेनशिलतेने प्रकरण हाताळावे असे सांगण्यात आले आहे. आरोग्य मंत्री रघु शर्मा, मुख्य सचिव डी. बी गुप्ता, अतिरिक्त सचिव गृह राजीव राजीव स्वरूप, पोलीस महासंचालक भुपेंद्र सिंघ हे बैठकीला उपस्थित होते.