नवी दिल्ली - भारत सरकारने आरोग्य मंत्रालय आणि देशातील सर्व राज्यांना या संदर्भात पत्राद्वारे पीपीई कीट, एन-९५ मास्क आणि व्हेंटिलेटरसारख्या अत्यावश्यक आणि महत्वपूर्ण वैद्यकीय उपकरणांची खरेदी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत या महत्वाच्या उपकरणांची खरेदी आणि त्याचे सर्व राज्यभरात वितरण व्हायला हवे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
काही राज्यांजवळ सध्या अत्यावश्यक सेवेतील उपकरणांच्या सुविधा आहेत. व्हेंटिलेटरच्या काही यादी राज्यांमध्ये पडून असू शकतात, काही सध्याच्या स्थितीत कार्यरत नसतील. मात्र, राज्य आरोग्य विभागाने याकडे लक्ष देऊन त्यांना दुरुस्त करुन वापर करण्यायोग्य तयार करावे. कोरोना संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी व्हेंटीलेटरसारख्या महत्वपूर्ण उपकरणांना सध्या परिस्थितीशी झगडण्यासाठी तयार करणे गरजेचे असल्याचे, राज्य व केंद्रशासित प्रदेशांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
यासोबत महत्वपूर्ण अशा या उपकरणांना चालवण्यासाठी कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळाचे पुरेसे मूल्यांकनही राज्याने केले पाहिजे आणि कौशल्य विकासासाठी पुरेसे प्रशिक्षण विभागामार्फत आयोजित केले जावे, असेही केंद्र आरोग्य मंत्रालयाने सुचवले आहे.
याबरोबरच, “राज्यांमध्ये ऑक्सिजन सिलेंडर्सची उपलब्धता प्रमाणित करणे आवश्यक आहे. कोरोना रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी राज्यांना त्यांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्याची गरज आहे,” असेही आरोग्य मंत्रालयाने आपल्या पत्रात म्हटले आहे.