नवी दिल्ली-नागरी उड्डाण महासंचालनालयाने भारताच्या विमानतळ प्राधिकरणाला संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथून आपल्या देशात विनापरवाना येणाऱ्या चार्टर विमानांना उतरण्यास मनाई करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत नागरी उड्डाण महासंचालनालयाने यांनी विमानतळ प्राधिकरणाला पत्र लिहिले आहे.
संयुक्त अरब अमिराती येथून भारतात येण्यासाठी परवानगी न घेता चार्टर विमाने भारतात येत असल्याचे निदर्शनास आले होते. आता विमान वाहतूक कंपन्यांच्या ज्या चार्टर विमानांना संयुक्त अरब अमिराती येथून भारतातील विमानतळावर यायचे असल्यास भारताच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडे त्याबाबतचा प्रस्ताव दाखल करावा लागेल.
जोपर्यंत विमान कंपन्यांना याबाबतची परवानगी दिली जात नाही तोपर्यंत भारतातील विमानतळावर उतरण्याची परवानगी देऊ नये, असे सांगण्यात आले आहे. कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
भारताच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाची परवानगी नसल्यास चार्टर विमानांना भारतातील विमानतळावर उतरता येणार नाही.