वॉशिंग्टन - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान यांच्या भेटी दरम्यान पाकिस्तानला मदत देणे थांबवविल्याच्या विषयावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, पाकिस्तान विध्वंसक होऊन आमच्या विरोधात गेल्याने मदत थांबवल्याचे ट्रम्प म्हणाले.
साधारण दीड वर्षापूर्वी अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी १.३ दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली आहे. ट्रम्प यांच्या या व्यक्तव्यावरुन पाकसमोरील आर्थिक अडचण कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पाकिस्तान सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याने तसेच, विविध आर्थिक आणि व्यापारी निर्बंध लागू झाल्याने जगभरातून आर्थिक मदत मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.
अमेरिकेकडून मागील अनेक वर्षांपासून पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत दिली जात होती. मात्र, मागील दीड वर्षांपासून ती थांबवण्यात आली आहे. 'आम्ही पाकिस्तानला अनेक वर्षे मदत दिली. मात्र, पाकिस्तानने आमच्यासाठी काही केले नाही. त्यांनी मोठ्या प्रमाणात विध्वंस चालवला होता. ते आमच्या विरोधात जात होते. त्यामुळे आम्ही ही मदत थांबवली,' असे उत्तर देत ट्रम्प यांनी पाकला फटकारले आहे.
'ट्रम्प यांचे बोलणे ऐकत असताना इम्रान खान अस्वस्थ झाले होते. तसेच, निराशपणे मान हलवत होते,' अशी माहिती सूत्रांनी दिली.