२४ आणि २५ फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड जे ट्रम्प पहिल्यावहिल्या अधिकृत भारत भेटीसाठी येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी लाल गालिचा अंथरण्यासाठी मोदी सरकारने कंबर कसली आहे. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ट्रम्प आपल्या दोन दिवसांच्या आणि तीन शहरांच्या दौऱ्याची सुरूवात अहमदाबादच्या भेटीने करतील. येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाच्या 'कॅरिअर वन' या विमानाने ते दाखल होतील. यावेळी राजशिष्टाचार डावलून पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर स्वतः ट्रम्प आणि त्यांची पत्नी फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांचा अहमदाबादच्या रस्त्यावरून २२ किलोमीटरचा रोड शो होईल ज्यासाठी लाखो नसले, तरी खूप मोठा जमाव उपस्थित असेल. १२ हजार सुरक्षा दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात असतील. अहमदाबादचे महापालिका आयुक्त विजय नेहरा यांनी ट्विट करून सांगितले आहे की, #मारोअमदाबाद म्हणतेय #नमस्ते ट्रम्प. #इंडियारोडशो अधिकाधिक विराट होत आहे. एक लाखांहून अधिक लोकांनी २२ किलोमीटरच्या या रोड शोसाठी अगोदरच आपला सहभाग नक्की असल्याचे कळवले आहे. भारतीय संस्कृतीचे जगाला दर्शन घडवण्याची महान संधी अहमदाबादला मिळाली आहे.
अहमदाबादमधील पहिल्या भेटीसाठी तीन तासांची वेळ निर्धारित केली असून यात साबरमती आश्रमाला धावती भेट आणि शांतपणे दुपारच्या भोजनाचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले. दोन्ही सर्वोच्च नेते समाजातील सर्व थरांतील नागरिकांशी संवाद साधतील आणि मोटेरा येथील नागरिकांचा भरगच्च सहभाग असलेल्या नव्या क्रिकेट स्टेडियममध्ये नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम दुपारनंतर अर्ध्या तासाने होईल. गेल्या वर्षी ह्यूस्टन येथे झालेल्या 'हाऊडी मोदी' या अमेरिकेतील भारतीय नागरिकांच्या कार्यक्रमापेक्षा हा कार्यक्रम कितीतरी मोठा होण्याची अपेक्षा आहे. कारण, इतिहासात प्रथमच अमेरिकन अध्यक्षाने अमेरिकेतील सार्वजनिक कार्यक्रमात भारतीय पंतप्रधानासमवेत हजेरी लावली होती.
त्यानंतर फर्स्ट लेडी मेलोनिया आणि अध्यक्ष आग्र्यासाठी उड्डाण करतील, असे सूत्रांनी सांगितले आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ट्रम्प पतीपत्नीचे स्वागत करतील. प्रेमाचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या ताज महाल या ऐतिहासिक स्मारकात ट्रम्प दांपत्य काही काळ व्यतीत करेल. २५ फेब्रुवारीच्या अधिकृत कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपती भवन येथे समारंभपूर्वक मानवंदना, राजघाट येथे पुष्पचक्र अर्पण करणे, हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी यांच्याशी मर्यादित अधिकारीच उपस्थित असलेली आणि शिष्टमंडळस्तरीय बोलणी, अधिकृत भोजन, नेत्यांच्या सदिच्छा भेटी, अमेरिकन दूतावासात मीट अँड ग्रीट हा सोहळा आणि राष्ट्रपतींनी दिलेली मेजवानी यांचा समावेश आहे. त्यानंतर ट्रम्प दांपत्य वॉशिंग्टन डीसीला रवाना होईल.
माध्यमांसाठी संयुक्त निवेदन काढल्यावर, दोन्ही नेते भारतीय आणि अमेरिकन माध्यम प्रतिनिधींचे एक किंवा दोन प्रश्न घेतील की प्रश्नच घेणार नाही, हे अद्याप ठरलेले नाही. अधिकृत बोलण्यांनंतर, ट्रम्प ज्या भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत रोजगार निर्मिती केली आहे, त्यांच्या सीईओंशी रूझवेल्ट हाऊस येथे संवाद साधतील, अशी अपेक्षा आहे. त्याच दिवशी सीआयआय, अनंता अस्पेन आणि युएसआयबीसी या उद्योग चेंबर्स आणि विचारवंत गटांतर्फे स्वतंत्र गोलमेज परिषद आयोजित केली जाणार आहे. उद्योजकांची समांतर बैठकीत दोन्ही सर्वोच्च नेत्यांची उपस्थिती नसेल. मात्र, त्यात भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापारासंदर्भात ५०० अब्ज अमेरिकन डॉलरचा आराखड्यावर चर्चा केली जाईल. आणखी एका स्वतंत्र कार्यक्रमात अमेरिकन फर्स्ट लेडी दिल्ली सरकारच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची अपेक्षा आहे. याच शाळांमध्ये सुधारणा राबवल्यानेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवला आहे. हेच कारण त्यांच्या सत्तेत वापसीचे समजले जाते.
ट्रम्प यांच्या दौऱ्यात अमेरिकन व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लाईटहायझर उपस्थित नसल्याने, व्यापार आणि सेवा वगळून इतर गोष्टींवर भर देणारा छोटासा करारही होण्याची शक्यता नाहीच. कृषी, दुग्धोत्पादन, कोरोनरी स्टेंट्ससह वैद्यकीय साधने आणि आयसीटी भाडे यासह विविध प्रमुख क्षेत्रांवरील गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या वाटाघाटी अडकल्या आहेत. सूत्रांच्या अनुसार, अधिकृत बोलण्यांमध्ये उपस्थित केल्या जाणारे प्रमुख मुद्दे संरक्षण आणि उर्जा क्षेत्रातील सहकार्याचे असतील. भारत अमेरिकेशी व्यापार अधिशेष कमी करण्यासाठी पुढील मार्ग शोधण्याकडे भारत पहात आहे. भारताचा अमेरिकेशी असलेला व्यापार अधिशेष हा ३० अब्ज अमेरिकन डॉलरवरून १६ अब्ज अमेरिकन डॉलरवर आला आहे.
- स्मिता शर्मा, नवी दिल्ली