नवी दिल्ली - इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या डॉक्टरांच्या संघटनेने येत्या १७ जूनला देशव्यापी संप पुकारण्याचे आवाहन केले आहे. बंगालमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांनी सुरू केलेला हा लढा उग्र रूप घेत असून बंगालमध्ये आतापर्यंत ३०० डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत.
बंगालमध्ये एका डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बंगालच्या डॉक्टारांनी ५ दिवसांपासून संप सुरू केला आहे. मात्र, त्यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी योग्य प्रतिसाद न दिल्याने या संपाचे लोण देशभर पसरले. काल (१४ जून) दिल्ली, मुंबई, नागपूर, हैदराबाद, केरळ, राजस्थान या ठिकाणीही संप पुकारण्यात आला होता.
बंगालमध्ये सुरू झालेला हा डॉक्टरांचा संप मागे घेण्याचा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला होता. या आंदोलनामागे माकप आणि भाजप यांचा हात असून एसएसकेएम रुग्णालयात बाहेरचे लोक घुसून त्यांनी हा असंतोष निर्माण केला आहे, असा आरोप त्यांनी केला होता. ममतांच्या या वक्तव्याची त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही डॉक्टरांच्या संघटनेकडून केली जात आहे.
डॉक्टरांच्या संघटनेने ममतांपुढे ६ अटी ठेवल्या असून त्या पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचा इशारही देण्यात आला आहे. आतापर्यंत कोलकात्याच्या एसएसकेएम रुग्णालयातील १७५ डॉक्टरांनी राजीनामा दिला असून राजीनामा देणाऱ्या डॉक्टरांचा आकडा ३०० पर्यंत पोहोचला आहे. ममतांनी राज्य सचिवालयात डॉक्टरांना चर्चेसाठी बोलवले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यावर बहिष्कार टाकत ममता आमची एकता तोडण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.
मागण्या मान्य न झाल्यास येत्या १७ जूनला देशव्यापी संप पुकारण्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या डॉक्टरांच्या संघटनेने दिला आहे. १७ जूनला अत्यावश्यक सेवा वगळता सर्व रुग्णसेवा बंद असतील. या संपात सहभागी होण्याचे आवाहन आयएमएतर्फे करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या या संपाचा फटका रुग्णांना बसत असून ओडिशात प्रसुतीदरम्यान एका महिलेचा तिच्या जुळ्या मुलांसह मृत्यू झाल्याची घटना घडली होती.