चेन्नई - देशभरामध्ये कोरोनाविषाणूने थैमान घातले असून मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. तामिळनाडूतील डीएमके पक्षाचे आमदार जे.अंबाझगन यांचा मंगळवारी सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुर्दैवी बाब म्हणजे जन्मदिनीच त्यांचा मृत्यू झाला आहे. ते 62 वर्षाचे होते.
2 जुनला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती दोन दिवसांपासून जास्तच खालावली होती. त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टम अर्थात व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अंबाझगन हे द्रमुकचे सुप्रसिद्ध नेते आणि पक्षाचे जिल्हा सचिवही होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात पक्षाच्या अनेक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले होते. पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टालिन यांचे जवळचे संबध होते. दरम्यान तामिळनाडूमध्ये 307 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 34 हजार 914 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 16 हजार 282 रुग्ण सक्रिय आहेत.