नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे गैरसोय होत असल्याने परप्रांतीय मजुरांनी त्यांच्या मूळ राज्यात परतायला सुरुवात केली आहे. बिलासपूरमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे बांधकाम करणाऱ्या 107 कामगारांना त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत असून त्यांना काही दिवसांतच घरी परत पाठविण्यात येणार आहे.
सर्व मजुरांना शहरातील माध्यमिक शाळेत उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात ठेवले आहे. बिलासपूरच्या कोथिपुरा येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था उभारण्यात येत आहे. कोरोनामुळे येथील कामगार शुक्रवारी रात्री पायीच घराकडे निघाले होते. मात्र, चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गावर पोलीस पथकाने त्यांना रोखले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस व जिल्हा प्रशासनाचे उच्च अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. रात्री एक वाजेपर्यंत पोलिस व जिल्हा प्रशासन कामगारांना समजावण्याचा प्रयत्न करत राहिले, परंतु, मजुर परत बिलासपूरला येण्यास तयार होत नव्हते. अखेर प्रशासन त्याच्या घरी जाण्याची व्यवस्था करेल, असे आश्वासन अधिकाऱयांनी दिल्यानंतर कामगारांनी पुन्हा बिलासपूरला येण्याचे मान्य केले.
एम्समध्ये काम करणाऱया कामगारांपैकी 37 यूपीचे, 33 झारखंडचे, बिहारमधील 33 आणि मध्य प्रदेशमधील 4 मजुरांना प्रशासन घरी पाठणार आहे. मजुरांना घरी पाठवण्यासाठी जिल्हा प्रशासन आपल्या पातळीवर सर्व तयारी करत आहे.