काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणुकांची मागणी करणारे असंतुष्टांचे पत्र हे राहुल गांधींविरुद्धचे षड्यंत्र आहे आणि हे असेच सुरू राहिले, तर पक्षात फुट पडू शकते. वरिष्ठ नेते संजय निरुपम यांनी वरिष्ठ पत्रकार अमित अग्निहोत्रींना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
- काँग्रेसमध्ये नेतृत्वाबद्दल इतके वाद का सुरू आहेत ?
नेतृत्वाबद्दल वाद सुरू आहेत, कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. राहुल गांधींनी अशी भूमिका घेतली की त्यांना अध्यक्षपद नको आहे आणि गांधी कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीने पक्षाचे नेतृत्व करावे. ती व्यक्ती शोधण्याचे काम सुरू होते. दरम्यान सोनिया गांधींनी हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली. तेव्हापासून काँग्रेस अध्यक्ष कोण यावर वाद सुरूच आहे.
- काँग्रेस पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी नुकतेच सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष हवा आणि अंतर्गत निवडणुकीची मागणी केली. तुम्ही याला षडयंत्र म्हणता का ?
हा वादाचा मुद्दा नाही. कोणत्याही कार्यशील राजकीय पक्षाला त्यांच्या कार्यकाळात पूर्णवेळ अध्यक्षांची आवश्यकता असते. ती चांगली गोष्ट आहे. पण इथे मला हे स्पष्ट करायचे आहे की, काही वरिष्ठ नेत्यांनी लिहिलेले हे पत्र म्हणजे काँग्रेस आणि गांधींना अस्थिर करण्याच्या षडयंत्राचा भाग आहे. राहुल गांधींविरोधातले हे कारस्थान पूर्वी दिल्लीत पक्षाच्या काही नेत्यांच्या घरी सुरू होते. असंतुष्टांचे हे पत्र या षडयंत्राचाच एक भाग आहे. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला असे वाटते की अशा प्रकारे निवडणूक घेऊ नये.
- पण का ?
कारण , मला असे वाटते की अशा निवडणुकीमुळे अनेक गट निर्माण होतील. त्यामुळे पक्षातील नेत्यांमध्ये कटुता निर्माण होईल आणि यामुळे वैरभाव निर्माण होऊन काँग्रेस पक्षात फूट पडेल. मला वाटते अशी निवडणूक सामर्थ्याचे दर्शन करण्यासाठी होईल. नेते संघटनेत आपला प्रभाव किती आहे हे दाखवण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करू लागतील. जेव्हा आम्ही सर्व जण पक्ष बळकट करण्यासाठी एकत्र काम करत आहोत, त्यावेळी याची गरज नाही.
- पण अंतर्गत लोकशाही असणे ही काय वाईट कल्पना आहे ?
अंतर्गत लोकशाही हवी आणि कुठल्याही लोकशाहीवादी संघटनेत अंतर्गत पक्ष मतदान हवे. पण मला टीकाकारांना विचारायचे आहे की, किती राजकीय पक्ष ही कृती करतात ? आम्हाला प्रश्न विचारणाऱ्या कुठल्याही इतर पक्षांमध्ये ही व्यवस्था नाही. मला हेही विचारायचे आहे की किती काँग्रेस कार्यकारी समितीच्या सभासदांनी निवडणूक जिंकली आहे ? त्यांनी खरे तर प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला बळकट करायला हवे आणि पक्षाला कमकुवत करतील, पक्षात फूट पडेल असे प्रश्न निर्माण करायला नको.
- काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली तर ती राहुल गांधींच्या विरोधात जाईल का ?
समजा अशी निवडणूक झालीच तर त्याचा निकाल मी तुम्हाला आधीच सांगू शकतो. राहुलजींनी ही निवडणूक लढवली तर ते एकहाती जिंकू शकतील. पक्षाच्या भारतीय युवा काँग्रेस आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियासारख्या पक्षाच्या युवा शाखांमध्ये राहुलजींनाच पसंती आहे. तुम्ही युवा संघटनेत जाऊन ओपिनियन पोल घेऊ शकता. तुम्ही पक्षाचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे कार्यकर्ते यांना काँग्रेस अध्यक्ष कोण हवे म्हणून विचारू शकता. पण तरीही मी हेच सांगतोय की एकदा आता निवडणूक घ्या म्हणून सतत तगादा लावत असेल, तर पक्षासाठी हे योग्य नाही, असे मला वाटते.
- काँग्रेससमोर आज सर्वात मोठे आव्हान कोणते आहे ?
गेले 18 महिने कार्यकर्त्यांमध्ये उर्जा निर्माण करेल असा पूर्ण वेळ नेता देशभरात नाही. काँग्रेसमध्ये अनेक निष्ठावान कार्यकर्ते आहेत.पण आजघडीला ते विखुरले आहेत. आम्हाला त्यांना प्रोत्साहित करायची गरज आहे. काँग्रेसच्या तुलनेत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष हा खूप बलाढ्य बनला आहे. आम्हाला काँग्रेसला बळकट करायचे आहे. एकदा का राहुलजींनी पक्षाच्या अध्यक्षपदाची कमान हातात घेतली , की मग त्यांनी कार्यकर्त्यांना प्रेरित करण्यासाठी देशभर फिरले पाहिजे.
- हे सगळे किती लवकर होऊ शकते ?
24 ऑगस्ट रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला की सहा महिन्यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन घेतले जाईल. माझ्या मते साधारण मार्च एप्रिल 2021 ला ते होईल. त्यात नेतृत्व आणि निवडणुका अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उकल होईल आणि राहुल गांधी नवे पक्षाध्यक्ष असतील.