नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरूवारी आपल्या व्हिडिओ संदेशाचा दुसरा भाग प्रदर्शित केला. यामध्ये त्यांनी नोटबंदीवरुन केंद्रावर निशाणा साधला आहे. देशासमोर गेल्या ४० वर्षांमध्ये आले नव्हते असे आर्थिक संकट आले आहे, आणि त्याला नोटबंदी जबाबदार असल्याचे राहुल म्हणाले.
नोटबंदी हा देशाच्या गरीबांवर, शेतकऱ्यांवर, लहान दुकानदारांवर आणि मजूरांवर केलेला हल्ला होता. तसेच हा देशाच्या असंघटित अर्थव्यवस्थेवरही हल्ला होता, असे ते पुढे म्हणाले. राहुल गांधींनी यापूर्वीही देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत बोलतानाचा आपला एक व्हि़डिओ प्रदर्शित केला होता. आज प्रदर्शित केलेल्या दुसऱ्या व्हिडिओचे नाव 'नोटबंदी की बात' असे होते. मोदीजींच्या स्वप्नातील 'कॅशलेस भारत' हा खरेतर 'शेतकरी-मजूर-लहान उद्योजक विरहीत' भारत आहे, असेही ते म्हणाले.
नोटबंदीमुळे संपूर्ण देशातील लोक बँकांच्या बाहेर रांगा लाऊन उभे होते. या निर्णयामुळे काळा पैसा नष्ट झाला? नाही. शिवाय, देशातील गरीब लोकांना याचा काय फायदा झाला? - काहीच नाही! नोटबंदीचा फायदा हा केवळ देशातील मोठमोठ्या कोट्यधीशांना मिळाला. सामान्य माणसांचा पैसा वापरुन तब्बल ५० मोठ्या उद्योजकांचे कर्ज माफ करण्यात आले.
नोटबंदीचे दुसरे एक मोठे लक्ष्य होते, ते म्हणजे अर्थव्यवस्थेमधून 'कॅश' हद्दपार करणे. मात्र देशातील मोठ्या प्रमाणात असलेली असंघटित अर्थव्यवस्था ही केवळ रोख व्यवहारांवर चालते. त्यामुळे मोदींना अपेक्षित अशा कॅशलेस इंडियामध्ये असंघटित क्षेत्र हे नष्ट होईल, असे राहुल म्हणाले.
हेही वाचा : 'इस्लामिक स्टेट'शी संबंध असल्याच्या संशयातून पाच जणांविरोधात आरोपपत्र; एनआयएची कारवाई