नवी दिल्ली - उत्तर पूर्व दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी दिल्ली पोलीस स्पेशल सेलने जेएनयु विद्यापीठातील विद्यार्थी नेता उमर खालिदची चौकशी केली. ही चौकशी तब्बल 3 तास सुरू होती. दिल्ली पोलीसने ओमर खालीदचा मोबाईलही जप्त केला असून तपासणीसाठी फॉरेन्सिंक प्रयोगशाळेमध्ये पाठवला आहे.
दिल्ली गुन्हे शाखेकडून 6 मार्चला दंगा आणि कट रचण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या दंगलींसाठी आधीच कट रचला गेला होता. यामध्ये ओमर खालिद, दानिश आणि त्याचे दोन अन्य साथीदार वेगवेगळ्या संस्थांशी मिळालेले होते, असे एफआयआरमध्ये अरविंदकुमार यांच्या वतीने सांगण्यात आले होते.
लोकांना भडकवण्यासाठी ओमर खालिद यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी भाषण केले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्यावर आले असताना, लोकांना रस्ते बंद करण्याचे आवाहन खालिदने आपल्या एका भाषणादरम्यान केले होते.
गुन्हा नोंदवल्यानंतर पोलीस आयुक्त एस.एन. श्रीवास्तव यांनी त्याचा तपास विशेष कक्षाकडे सोपविला होता. या प्रकरणी स्पेशल सेलची टीम चौकशी करत होती. सेलने मीरान हैदर, सफूरा जरगर, दानिश इत्यादींनाही अटक करण्यात आली होती.