नवी दिल्ली - ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर विषेश तपास पथक आणि दिल्ली गुन्हे शाखेने दंगेखोरांची धरपकड सुरू केली आहे. आत्तापर्यंत ५३१ गुन्हे दाखल करण्यात आले असून १ हजार ६४७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हिंसाचाराप्रकरणी पोलिसांना हवा असलेला 'आप'चा नगरसेवक ताहिर हुसेन अजूनही फरार असून त्याचा थांगपत्ता लागला नाही.
दिल्ली पोलीस मुख्यालयाने बुधवारी रात्री उशिरा तपासंबंधीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार ईशान्य दिल्लीतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ५३१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील ४७ गुन्हे बेकायदा शस्त्र बाळल्याप्रकरणी आहेत. तर अटक करण्यात आलेल्यांची संख्या १ हजार ६४७ झाली आहे.
गुप्तचर विभागातील अधिकारी अंकित शर्मा हत्याकांड प्रकरणी पोलिसांना हवा असलेला आम आदमी पक्षाचा नगरसेवक ताहिर हुसेन अजूनही फरार आहे. त्याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब आणि इतर सामग्री आढळून आली होती. अंकितच्या कुटुंबियांनी ताहिर हुसेनवर हत्येचा आरोप लावला आहे. तर पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या शाहरुख खानला उत्तरप्रदेशातील संभळ येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने हिंसाचार सुरु असताना पोलिसांसमोर येत आठ वेळा गोळीबार केला होता.
काल(बुधवार) राहुल गांधीनी काँग्रेच्या प्रतिनिधीमंडळासह हिंसाग्रस्त ईशान्य दिल्लीचा दौरा केला. बृजपुरी येथे जाळपोळ करण्यात आलेल्या एका शाळेला राहुल गांधींनी भेट दिली. 'शाळा दिल्लीचे भविष्य असून द्वेष आणि हिंसेने शाळेला नष्ट केले आहे, याचा भारत मातेला काहीही फायदा नाही, असे माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांच्याबरोबर काँग्रेस नेते के. सी वेणुगोपाल, मुकुल वासनिक, खासदार अधीर रंजन चौधरी, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, खासदार के. सुरेश, गौरव गोगोई यांनीही परिसराची पाहणी केली.