नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी आज आणखी एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीतील चांद बाग परिसरात झालेल्या दंगलीशी या आरोपीचा संबंध आहे. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव खालिद सैफी असे आहे.
दिल्ली हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या दुसर्या आरोपपत्रात या आरोपीचे नाव आहे. 8 जानेवारीला शाहीन बागेत झालेल्या बैठकीत तो सामील झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) समर्थन देणारे आणि विरोध करणारे गट यांच्यात हिंसाचार वाढला होता. हिंसाचारामुळे कमीतकमी 53 जणांना आपला जीव गमवावा लागला तर शेकडो अन्य जखमी झाले होते.