नवी दिल्ली - आम आदमीचा निलंबित नगरसेवक ताहीर हुस्सेनचे तीन जामीन अर्ज दिल्ली न्यायालयाने फेटाळले आहेत. ईशान्य दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारात हुस्सेनचा सहभाग असल्याचा पोलिसांनी दावा केला आहे.
दिल्ली न्यायालयाचे न्यायाधीश विनोद यादव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ताहीर हुस्सेनचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. हिंसाचाराच्या घटनेत स्थानिक भागातील साक्षीदार असल्याचे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावताना नमूद केले. जर आरोपीची जामिनावर मुक्तता केली तर, तो साक्षीदाराला धमकाविण्याची शक्यता आहे, असेही न्यायालयाने निरीक्षण नोंदविले आहे.
काय आहे हिंसाचाराची घटना?
ईशान्य दिल्लीत २३ ते २९ फेब्रुवारी २०२० दरम्यान हिंसाचार झाला होता. सहा दिवस चाललेल्या या हिंसाचारात ५० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर २०० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले होते. सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात दिल्लीत हिंसाचार होण्याआधी मागील अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू होते. मात्र, या आंदोलनादरम्यान हिंसाचार उसळला होता. या प्रकरणी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खटला सुरू आहे.