नवी दिल्ली - जेएनयू विद्यार्थी शरजील इमामवर देशद्रोही भडकाऊ भाषण दिल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शनिवारी बेकायदेशीर कृती (प्रतिबंध) कायद्यांतर्गत दोषारोपपत्र दाखल केले. पटियाला हाऊस कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 27 जुलै या प्रकरणी सुनावणी होईल, असे पोलीस आयुक्त राजेश देव यांनी सांगितले.
भारतीय दंड संहितेचे कलम 124 अ, 133 अ, 133 ब, 505 (अफवा पसरवणे) आणि बेकायदेशीर उपक्रमांच्या कलम 13 अंतर्गत हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सध्या शरजील इमाम हा गुवाहाटी मध्यवर्ती कारागृहात असून तो कोरोनाबाधित आढळला आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील इतिहास विभागाचा विद्यावाचस्पती( पीएचडी) अभ्यासक असणाऱ्या शरजीलला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनांमध्ये त्याने केलेली प्रक्षोभक भाषणे सोशल मीडियावर पसरल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.
डिसेंबर महिन्यात अलीगढ मुस्लीम विद्यापीठात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान त्याने वादग्रस्त वक्तव्य केले होते.आसामला भारतापासून वेगळे करायला पाहिजे, असे तो म्हणाला होता. भारताच्या पूर्वेकडील राज्यांना जोडणारा भाग असलेल्या 'चिकन्स नेक' (चिंचोळा भूप्रदेश) येथे चक्का जाम करुन आसामला भारतापासून वेगळे करायला हवे, असे तो म्हणाला होता. देशद्रोहाच्या आरोपाबरोबरच दंगल घडवल्यासंबधी कलमांखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.