नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक जण शहरांमध्ये अडकून पडली आहेत. तर काही जण पायीच मैलाचा प्रवास करत आहेत. दिल्लीतील सिलमपूर येथे एक व्यक्ती गेल्या 50 दिवसांपासून चक्क आपल्या कारमध्येच राहत आहे.
बिजनौर येथील रहिवासी असलेले शहनवाज दिल्लीत वाहन चालक म्हणून काम करत होता. आपल्या बहिणीसोबत तो मेहुण्याच्या घरी राहत होता. मात्र, त्यांच्यामध्ये वाद झाल्याने मेहुण्याने त्याला घर सोडण्यास सांगितले. शहरामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे तो आपल्या घरीही जाऊ शकत नव्हता.
त्याच्या इतर सर्व नातेवाईकांनीही कोरोना विषाणुच्या भीतीने त्याला घरात घेण्यास नकार दिला. अखेर शहनवाजने आपल्या कारमध्ये राहण्याचे ठरवले. तो गाडीत राहून लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करीत आहे. दरम्यान शहनवाज रमजान उपवास करत असून इफ्तार आणि सहरीसाठी स्थानिक लोक त्याला जेवण देतात. लवकरच लॉकडाऊन संपेल आणि मी माझ्या घरी जाऊ शकेल, अशी आशा त्याने व्यक्त केली आहे.