नवी दिल्ली - दिल्लीमध्ये तीन नव्य कंटेंनमेंट झोन्सची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आता दिल्लीमध्ये एकूण ३३ हॉटस्पॉट्स झाले आहेत.
हॉटस्पॉट म्हणजे अशा जागा जिथे कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत, किंवा जिथे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. अशा झोन्समध्ये कर्फ्यूचे नियम अधिक कठोर केले जातात.
दिल्लीमध्ये देओली एक्स्टेंशनमधील ए-१७६ या घराशेजारील घरे, मानसरोवर गार्डनमधील ए-३० नंबरच्या घराजवळील घरे, आणि जहांगीरपुरीमधील रस्ता क्रमांक एक ते दहा या तीन भागांना कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रानंतर एक हजार रुग्णांचा टप्पा ओलांडणारे दिल्ली हे दुसरे राज्य ठरले आहे. दिल्लीमध्ये आतापर्यंत कोरोनाचे १,०६९ रुग्ण आढळून आले आहेत. यांपैकी १९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, २५ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत.
हेही वाचा : कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार संभव? भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद मंजुरीच्या प्रतिक्षेत