नवी दिल्ली - ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील मुख्य आरोपी ख्रिस्तियन मिशेलचा जामीन याचिका दिल्ली न्यायालयाने फेटाळली आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये मिशेलचे संयुक्त अरब अमिरातीमधून भारतात प्रत्यर्पण करण्यात आले होते.
ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरच्या ३६०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी मिशेल सध्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. गेल्या आठवड्यात मिशेलने पटियाला हाऊस न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.ईडी आणि सीबीआयने न्यायालयात मिशेलची जामीन याचिका फेटाळण्यात यावी, अशी मागणी केली होती. दरम्यान, मंगळवारी न्यायालयाने मिशेलला त्याच्या वकिलास भेटण्याची परवानगी दिली.
काय आहे प्रकरण?
देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी इटलीतील 'फिनमेकानिका' कंपनीची ब्रिटिश उपकंपनी असलेल्या 'ऑगस्टा वेस्टलँड'ची १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार तत्कालीन यूपीए सरकारच्या काळात झाला होता. मात्र, या खरेदीसाठी मध्यस्थ मायकल याने कंपनीकडून लाच स्वीकारुन त्यातील काही रक्कम भारतातील अतिवरिष्ठ पदांवरील व्यक्तींना वाटण्यात आल्याचा आरोप होऊ लागला. त्यानंतर हा खरेदी व्यवहार १ जानेवारी २०१४ ला रद्द करण्यात आला होता.