नवी दिल्ली - कोरोनाशी लढा देण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवी पंचसूत्री योजना मांडली आहे. '५टी' असे या योजनेचे नाव आहे. यासोबतच दिल्लीतील एक लाख लोकांची चाचणी पुढील काही दिवसांमध्ये करण्यात येणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालय, जी. बी. पंत रुग्णालय, आणि राजीव गांधी सुपर स्पेशॅलिटी रुग्णालय या तीन रुग्णालयांना कोरोनासाठी समर्पित करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सध्या दिल्लीमधील रुग्णालयांतील २,९५० खाटा या कोरोनाच्या रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. यासोबतच दिल्ली सरकार हॉटेलांच्या १२ हजार खोल्याही कोरोनाच्या रुग्णांसाठी घेणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली.
तबलिगी जमातच्या सदस्यांबाबत बोलताना केजरीवाल यांनी सांगितले, की निझामुद्दीन मरकज कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे फोन नंबर पोलिसांना देण्यात आले असून, त्यामार्फत त्यांचा शोध घेणे सुरू आहे. यासोबतच केजरीवाल यांनी पंचसूत्री योजना आखली आहे. टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट, टीमवर्क आणि ट्रॅकिंग अँड मॉनिटरिंग अशी ही ५-टी योजना असणार आहे.
हेही वाचा : मनमोहन सिंग यांच्यावरील उपचार यशस्वी; झाले कोरोना 'निगेटिव्ह'..