नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन यांनी ज्या राज्यांत केंद्राची आयुष्मान योजना लागू नाही तेथे ही योजना लागू करावी यासाठी पत्र लिहित आवाहन केले होते. याला उत्तर देताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आयुष्मान भारत योजनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
केजरीवाल यांनी केंद्राला पत्र लिहिले आहे, की केंद्राची योजना उत्तरप्रदेश आणि हरियाणा येथे लागू आहे. तरीसुद्धा या राज्यातील हजारो रुग्ण दिल्लीत दररोज उपचार करण्यासाठी का येतात? आयुष्मान फक्त ५ लाखांपर्यंतचा खर्च उचलते. परंतु, दिल्ली सरकारची योजना ३० लाखापर्यंतचा खर्च उचलते. त्यामुळे दिल्लीत आयुष्मान योजना दिल्लीत लागू करण्याची काही गरज नाही. केंद्राच्या योजनेपेक्षा दिल्लीची योजना १० पटीने मोठी आहे. दिल्लीच्या योजनेत आयुष्मान भारत योजनेपेक्षा जास्त सुविधा आहेत.
दिल्लीची स्वास्थ योजना सर्वांसाठी लागू
केजरीवाल म्हणाले, केंद्र सरकारच्या योजनेत दिल्लीचे फक्त १० टक्के लाभार्थी आहेत. परंतु, ज्यांच्याजवळ स्कुटर, मोटारसायकल आहे ते लाभार्थी होत नाहीत. त्यांनी उपचार कोठे घ्यायचे? कारण ते लोकही आर्थिकदृष्ट्या असमर्थ आहेत. दिल्ली सरकारच्या स्वास्थ योजनेत प्रत्येक व्यक्ती लाभार्थी आहे. दिल्लीची पूर्ण २ कोटी लोकसंख्या या योजनेची लाभार्थी आहे.