नवी दिल्ली –चीनने भारताबरोबर चर्चेत झालेल्या परस्पर सहमतीला ठेंगा दाखविला आहे. चीनचे सैनिक हे गलवान खोऱ्यातील प्रत्यक्ष ताबा रेषनिजीक असलेल्या ‘पोस्ट 14’ या ठिकाणी गस्त घालण्यासाठी परतले आहेत.
चिनी सैनिकांनी 'पोस्ट 14' या ठिकाणी तंबू ठोकले आहेत. तसेच टेहळणी केंद्रही सुरू केले आहे. चीनचे सैनिक हे मोठ्या संख्येने परतल्याचे सूत्राने सांगितले. दोन्ही देश या ठिकाणावरून सैनिक मागे घेण्यासाठी सहमत झाले होते.
सूत्राच्या माहितीनुसार कॉर्प्स कंमाडरच्या पातळीवर भारत आणि चीनमध्ये 22 जूनला बैठक झाली होती. या बैठकीत दोन्ही देशांनी तणाव होत असलेल्या पूर्व लडाखमधून सैनिक मागे घेण्याबाबत चर्चा केली होती. ही कॉर्प्स कंमाडरच्या पातळीवर 6 जूननंतर दुसरी बैठक होती.
मात्र, असे असले तरी चिनचे सैनिक हे त्याच ठिकाणी मोठ्या संख्येने परतले आहेत. चीनने मोठ्या प्रमाणात तैनात केलेले सैनिक ही भारत सरकारच्यादृष्टीने मोठी चिंताजनक बाब आहे. असे असले तरी पूर्व लडाखमध्ये सैन्यदल कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असल्याचे सूत्राने सांगितले.
15 जूनला गलवानच्या खोऱ्यात चिनी सैनिकांबरोबर झालेल्या हिंसक झटापटीत 20 जवानांना वीरमरण आले आहे. या हल्ल्यापूर्वी चीनने या प्रदेशात भारतीय सैनिक कसे तैनात आहे, हे पाहण्यासाठी थर्मल इमेजिंग ड्रोन्सचा वापर केला होता. त्यादिवशी चिनी सैनिकांनी केलेला सर्वात मोठा प्राणघातक हल्ला होता, असे सरकारी सूत्राने सांगितले.