पणजी (गोवा) - अपघातग्रस्त आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर येथे उपचार सुरू आहेत. या ठिकाणी योग्य उपचार होत असतील तर येथेच होतील. तरीही आवश्यकता भासली तर दिल्लीला हलविले जाईल, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी (दि. 12 जाने.) दिली.
नाईक यांची प्रकृती स्थिर
सिंह यांनी आज (मंगळवारी) दुपारी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात जाऊन डॉक्टरांशी चर्चा केली तसेच नाईक यांच्या तबेतीची पाहणी केली. त्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या अपघाताची माहिती सोमवारी मिळाली होती. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तबेतीची माहिती घेतली. त्यांच्या सांगण्यावरून आज मी आलो आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून योग्य उपचार सुरू आहेत, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
गरज भासल्यास दिल्लीला हलविले जाईल
नाईक यांच्यावर योग्य उपचार येथेच मिळाले तर येथेच त्यांच्यावर उपचार केले जातील. पण, आवश्यकता भासली तरच दिल्लीला हलविले जाईल. यासाठी दिल्ली एम्सचे डॉ. गुलेरिया यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच येथील डॉक्टर एम्सच्या डॉक्टरांशी चर्चा करतील. उपचार येथेच करावेत की, दिल्लीला हलविले जावे हे येथील डॉक्टरांच्या निर्णयावर अवलंबून आहे. कोणत्याही शक्यतेकडे दूर्लक्ष केले जाणार नाही. तसेच एअरलिफ्टची गरज आहे की नाही, हेही डॉक्टरांचे पथक ठरवेल, अशी माहिती मंत्री सिंह यांनी दिली.
हेही वाचा - केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या मोटारीला अपघात; पत्नीसह पीएचा मृत्यू
हेही वाचा - आयुषमंत्री श्रीपाद नाईकांची प्रकृती स्थिर, गोवा मुख्यमंत्री डॉ. सावंतांची माहिती