नवी दिल्ली - चीनी सैन्याने मे महिन्यात पूर्व लडाखच्या काही भागामध्ये घुसखोरी केल्याचे भारतीय संरक्षण मंत्रालयाने मान्य केले आहे. ५ मे पासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणि गलवान व्हॅलीच्या प्रदेशात चीनच्या हालचाली वाढल्या होत्या. १७ व १८ मेला कुगरांग नाला, गोग्रा आणि उत्तर पँगाँग लेकच्या प्रदेशात चीनी सैन्याने घुसखोरी केल्याचेही संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
याबाबत मंत्रालयाने काही कागदपत्रे त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केली आहेत. संरक्षण मंत्रालयाने प्रथमच चीनच्या घुसखोरीबद्दल उघडपणे मान्य केले आहे. या कागदपत्रांनुसार ६ जूनला दोन्ही बाजूच्या सैन्यातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची चर्चा झाली. मात्र, त्यानंतर १५ जूनला दोन्ही सैन्यांमध्ये चकमक झाली व त्यामध्ये जीवितहानी झाली. सध्या दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेली चर्चा लांबण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत भारत-चीन दरम्यान सैन्याच्या पाच उच्चस्तरीय बैठकी झाल्या आहेत मात्र, त्यातून विशेष असे काही निष्पन्न झाले नाही. दोन्ही बाजूचे अधिकारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर रणगाड्यांसह ४५ हजार सैन्य आणून ठेवले आहे.