नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात चीन आणि भारतच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला. यामध्ये भारताचे २० जवान हुतात्मा झाले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली. 'ही घटना अत्यंत दुःखद व त्रासदायक आहे. सैनिकांनी आपले कर्तव्य धैर्याने पार पाडले आणि हुतात्मा झाले. या कठीण काळात देशातील नागरिक खांद्याला खांदा लावून उभे आहेत. आम्हाला भारतीय सैनिकांच्या शौर्याचा अभिमान आहे', असे टि्वट राजनाथ यांनी केले आहे.
'जवानांचे बलिदान विसरले जाणार नाही. देश या कठिण परिस्थितीमध्ये खांद्याला खांदा लावून उभा आहे. देशाची अंखडता अबाधित ठेवण्यासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या वीर जवानांना सलाम, असे टि्वट राजनाथ सिंह यांनी केले आहे. तसेच जवानांच्या कुटुंबीयाप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.
भारत आणि चीन संघर्षानंतर दोन्ही बाजूने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीने तिन्ही दलाच्या प्रमुखांसहित चिफ ऑफ डिफेन्स यांच्यासोबत बैठक सुरू केली आहे. तसेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबतही संरक्षण मंत्र्यांचे बोलणे सुरू आहे.
काय घडलं भारत-चीन सीमेवर
चीन सीमेवर-सोमवारी चीनच्या सैन्याने लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल (एलएसी) च्या आपल्या बाजूला काही तात्पुरत्या निशाण्या उभ्या केल्या. त्यानंतर आपल्या सैनिकांनी त्या निशाण्या खाली उतरवल्या. सुरुवातीला चीनचे सैनिक मागे हटले, मात्र त्यानंतर ते जवळपास हजार सैनिक घेऊन परत आले. भारताचेही सुमारे हजार सैनिक तिथे होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हिंसक झटपट झाली. नदीच्या किनारी भागामध्ये ही झटपट सुरू असल्यामुळे कित्येक सैनिक नदीमध्ये पडले.