नवी दिल्ली : भारत- चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज(शुक्रवार) लडाखला भेट दिली. सिंह यांनी सीमेवरील लुकुंग या फॉर्वर्ड पोस्टवरील जवानांशी संवाद साधला. सरसेनाध्यक्ष बिपिन रावत आणि लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे त्यांच्यासोबत होते. संरक्षण मंत्र्यांनी सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला तसेच जवानांचे मनोबल वाढविले.
‘नुकतेच लडाखमधील पेट्रोलिंग पॉइंट 14 येथे सीमेचे रक्षण करताना आपल्या काही सैनिकांनी बलिदान दिले. तुमच्याशी चर्चा करताना मला आनंद होत आहे. मात्र, सैनिकांना गमावल्याने दु:ख होत आहे. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो’, असे राजनाथ सिंह म्हणाले.
भारतीय लष्करातील टी-90 रणगाडे आणि बीएमपपी इंन्फट्री वाहनांसह जवानांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत युद्ध सराव केला. सिंह यांनी लष्कराच्या पिका मिशनगनचे निरिक्षण केले. पॅराशुटमधून खाली उतरण्याचा सरावही जवानांनी केला. पंतप्रधान मोदींनी लडाखला अचानक भेट दिल्याने संरक्षण मंत्र्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. मात्र, सिंह यांनी आज लडाखला भेट दिली. लडाखमधून राजनाथ सिंह श्रीनगरला जाणार असून पाकिस्तान बरोबरच्या नियंत्रण रेषेवरच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची सिंह बैठक घेणार आहेत.
भारत चीन सीमेवरील तणावाची परिस्थिती निवळत असतानाचा संरक्षण मंत्र्यांनी सीमा भागात दौरा केला. विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चनंतर दोन्ही देशांतील तणाव निवळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, तणाव कमी करण्याची प्रक्रिया क्लिष्ट असून सीमेवरील परिस्थिती पडताळून पाहण्याची गरज भारतीय लष्कराने व्यक्त केली आहे.