पटना - बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात अचानक आलेल्या मेंदूज्वराच्या (चमकी रोग) साथीमुळे तब्बल ८४ मुलांचा मृत्यू झाला आहे. 'अक्युट एन्सेफीलीटीस सिंड्रोम' (स्थानिक नाव चमकी) म्हणजेच मेंदूज्वराचे अनेक रुग्ण शिकार झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांचा समावेश आहे.
मुझफ्फरपूर जिल्ह्यातील श्रीकृष्ण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि केजरीवाल रुग्णालयात आतापर्यंत ८४ मुलांचा मृत्यू झाला असल्याची माहीत जिल्हा प्रशासनाने दिली आहे. गेल्या १ जून पासून या दोन्ही रुग्णालयात ३०० पेक्षा जास्त मुलांना दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी ८४ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर ६९ मुलांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या घटनेची दखल घेतली असून मृतांच्या कुंटुंबीयांना ४ लाखांची मदत जाहीर केली आहे. बिहारच्या वैशाली, मोतीहारी, सितामढी आणि शिवहर या जिल्ह्यांत या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. नितिश कुमारांनी आरोग्य प्रशासनाला योग्य सुविधा पुरवण्याचे आदेश दिले आहे.