नवी दिल्ली - कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे अनेकांची लग्ने पुढे ढकलली आहेत. मात्र, उत्तर प्रदेशमधील एका 23 वर्षीय तरुणाने ठरवलेल्या तारखेलाच लग्न केले आहे. 100 किलेमीटर सायकलवर प्रवास करत त्याने वधूचे घर गाठले.
कलकू प्रजापती हा हमीरपूर जिल्ह्यातील पौठिया गावातील रहिवासी आहे.त्याने लग्नासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. मात्र, त्याच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्याने शेजारच्या जिल्ह्यातील पुणिया गावात आपल्या वधू रिंकीच्या घरी सायकलवरून जाण्याचा निर्णय घेतला.
चार-पाच महिन्यांपूर्वी हे लग्न ठरले होते. लॉकडाऊनमुळे लग्नासाठी स्थानिक पोलिसांकडून परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे मला सायकलवरून जाण्याशिवाय पर्याय नव्हता, असे तो म्हणाला. कलकू प्रजापतीने दहावीपर्यंत शिक्षण घेतले असून तो व्यवसायाने शेतकरी आहे. विशेष म्हणजे, हे लग्न एका गावातल्या मंदिरात करण्यात आले आहे. वधू आणि वर दोघेही त्यांच्या सामान्य पोशाखात मास्क लाऊन लग्न केले.
अलीकडे लग्न ठरल्यानंतर लगेच उरकून टाकण्याकडे सर्वांचा भर आहे. मात्र, सध्या आलेल्या कोरोना संकटामुळे लग्न ठरलेल्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. लग्नाची तारीख वारंवार पुढे ढकलावी लागत असल्याने अनेक जण त्रस्त झाले आहेत.