भुवनेश्वर - ओडिशामध्ये फनी चक्रीवादळात मृतांची संख्या वाढून १६ वर पोहोचली आहे. राज्यातील जवळपास १० हजार गावे आणि ५२ शहरी भागांमध्ये युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. या चक्रीवादळाचा सुमारे १ कोटी लोकांना फटका बसला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. १६ मृतांपैकी ४ जण मयूरभंज येथील असून पुरी, भुवनेश्वर आणि जाजपूर येथील प्रत्येकी तीन जण आहेत. क्योंझर, नयागढ आणि केंद्रपाडा येथे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
२४० किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे
या भीषण चक्रीवादळात २४० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे वारे होते. यामुळे शुक्रवारी पुरीमध्ये जोरदार पाऊस झाला. येथून ते पश्चिम बंगालमध्ये शिरण्यापूर्वी गावातील काही घरांची छते उडून गेली. तर, काही कच्ची घरे जमीनदोस्त झाली.
हे चक्रीवादळ अत्यंत शक्तिशाली असून ग्रीष्म कालीन चक्रीवादळांमध्ये अगदी क्वचितच असे वादळ येते. ते किनारपट्टीच्या प्रदेशात शुक्रवारी आले होते. असे वादळ ४३ वर्षांनंतर प्रथमच आले आहे. तसेच, ते मागील १५० वर्षांतील ३ सर्वाधिक ताकदवान वादळांपैकी एक होते. याआधी १९९९ मध्ये सुपरसायक्लॉन नावाचे वादळ आले होते. यात तब्बल १० हजार लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच, मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला होता.
मुख्यमंत्री पटनाईक यांनी केले हवाई सर्वेक्षण
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी येथील वादळ प्रभावित भागांची पाहणी केली. याआधी सामाजिक संस्था, एनडीआरएफ, ओडिशा आपत्ती बचावकार्य दलाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांसह सुमारे २ हजार आपात्कालीन कर्मचारी जनसजीवन सुरळीत करण्याचे काम करत आहेत.
पंतप्रधान मोदी ओडिशाला जाण्याची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री पटनाईक यांच्याशी संवाद साधला असून राज्याच्या परिस्थितीविषयी चर्चा केली. मोदी ओडिशा दौरा करण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनी राज्य सरकारला सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
रेल्वे, विमानसेवा हळूहळू पूर्ववत
२ रेल्वे वगळता भुवनेश्वरला जाणाऱ्या सर्व रेल्वेंची वाहतूक रविवारपासून सुरू करण्यात येत आहे. सिलादह, हावडा स्थानकांवर रेल्वे सेवा सामान्य झाल्या आहेत. चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर २४ तासांतच सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. कोलकाता विमानतळावर सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी विमान सेवा सुरू झाली आहे.