रांची (झारखंड) - कोरोनामुळे घरीच बसून असलेल्या नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. पंतप्रधान मदत निधीच्या नावाखाली खोटी 'युपीआय आयडी' तयार करून लोकांना त्यावर मदत पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. काहींनी या खोट्या आयडीवर पैसे पाठवल्यामुळे त्यांची फसवणूक झाली आहे.
झारखंडच्या हजारीबाग भागात याप्रकारे पंतप्रधान मदत निधीच्या नावाखाली 51 लाख रुपये सायबर चोरट्यांनी हडपले आहेत. यावर आता विशेष पोलीस सायबर पथक काम करत असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
सायबर चोरटे पंतप्रधान मदत निधीत पैसे जमा करा, ईएमआयची तारीख वाढवा, दारूची ऑनलाईन खरेदी करा, अशा प्रकारची आमिषे दाखवून लोकांची फसवणूक करत आहेत. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत एटीएम पिन, ओटीपी व बँकेची इतर माहिती कोणालाही अजिबात देऊ नये. त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते, असे रांचीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अनिष गुप्ता यांनी सांगितले.
कशाप्रकारे घातला गंडा
कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतनिधी फंडाचे नाव 'PMCARES@SBI' असे ठेवले आहे. मात्र, सायबर चोरट्यांनी यातील S अक्षर वगळून 'PMCARE@SBI' या नावाचे खोटे खाते बनवून लोकांना यावर पैसे मदत म्हणून भरण्याचे आवाहन केले. त्यामुळे झारखंडसह देशातील अनेक लोकांनी या खात्यावर पैसे भरले आहेत. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मदत निधी देताना खात्याची व्यवस्थित पडताळणी करूनच पैसे ट्रान्सफर करावे, अन्यथा फसवणूक होऊन योग्य व्यक्तींपर्यंत तुमचा मदतनिधी पोहचला जाणार नाही.
सोशल मीडियावरूनही फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. सायबर चोरटे तुमच्या सोशल मीडिया खात्यांवर लक्ष ठेवून असतात. कोरोनासाठी मदत निधीच्या नावाखाली गुगल पे, फोन पे, युपीआईच्या खोट्या खात्यांवर पैसे भरण्याचे आवाहन करण्यात येते. त्याला बळी पडू नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे.