नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर पराजयाची कारणमीमांसा करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यसमितीची (CWC) बैठक सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीदरम्यान पक्षाध्यक्ष पराजयाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची शक्यता आहे.
LIVE UPDATES :
1:15 PM - काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला असल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे. अजून बैठक सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
12:55 PM - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राहुल गांधींना राजीनामा मागे घेण्याचा सल्ला दिला आहे. 'हार-जीत सुरूच राहते. तुम्ही राजीनामा मागे घ्यावा,' असे सिंग यांनी म्हटले आहे.
12:45 PM - काही नेत्यांनी राहुल गांधींना त्यांची टीम बदलण्याचा सल्ला दिला आहे. 'आपण राजकारणातील दिग्गजांना आपल्या जवळ ठेवावे. तेव्हाच पक्ष अधिकचांगल्या रीतीने काम करू शकेल. त्यामुळे राजीनामा परत घ्यावा,' असे राहुल यांना सुचविण्यात आले आहे.
12:33 PM - राहुल गांधींनी काँग्रेस कार्यसमितीसमोर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मात्र, समितीकडून तो स्वीकारण्यात आला नाही.
- 'कथित मोदी लाटेचा फटका अनेक पक्षांना आणि नेत्यांना बसला आहे. त्यांना हार पत्करावी लागली आहे. त्यांच्यापैकी कोणत्याही पक्षाच्या अध्यक्षाचा राजीनामा मागण्यात आलेला नाही किंवा त्यांनी तो स्वतःहूनही दिलेला नाही. हा आमच्या नेत्याची निंदा करण्याचा प्रकार आहे. त्यांना लक्ष्य करण्याचा जाणीपूर्वक प्रयत्न सुरू आहे. हे सर्व थांबले पाहिजे. पक्षाने नेत्याच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे,' असे वरिष्ठ नेते संजय निरुपम यांनी म्हटले आहे.
- 'सीडब्ल्यूसीच्या बैठकीत पराजयाची कारणमीमांसा होण्यासोबतच यापुढे पक्षाला मजबूत स्थितीत नेण्याच्या दृष्टीनेही चर्चा होईल,' असे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.
- बैठकीत संपुआ अध्यक्ष सोनिया गांधींसह पक्षाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, उत्तर प्रदेश पूर्वच्या महासचिव प्रियांका गांधी, मोतीलाल वोरा, माजी केंद्रीय मंत्री आर. पी. एन. सिंग, पी. एल. पुनिया, पी. चिदंबरम, मल्लिकार्जुन खरगे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि कार्यसमितीचे इतर सदस्य सहभागी झाले आहेत.
- पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेही बैठकीला उपस्थित आहेत.
- याआधी उत्तर प्रदेश काँग्रेस प्रमुख राज बब्बर यांनी पक्षाच्या निराशाजनक कामगिरीनंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्त केला होता. त्यांच्याशिवाय पक्षातील अनेक नेत्यांनी राजीनामा दिला आहे. ओडिशामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रदेश काँग्रेस समिती अध्यक्ष निरंजन पटनायक यांनीही शुक्रवारी राजीनामा दिला होता.
- लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये काँग्रेसला देशभरात केवळ ५२ जागा मिळाल्या. २०१४ मध्ये याहीपेक्षा कमी म्हणजे ४४ जागा मिळाल्या होत्या.