नवी दिल्ली - अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी खास तयार केलेले बोईंग कंपनीचे विमान आज भारतात दाखल झाले आहे. अमेरिकेतील टेक्सास प्रातांमधून १५ तासांच्या प्रवासानंतर हे विमान भारतात उतरले. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या प्रवासासाठी हे विमान अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज करण्यात आले आहेत. यातील बदलांसाठी विमान अमेरिकेला नेण्यात आले होते.
ऑगस्ट महिन्यातच बोईंग कंपनी विमान भारताच्या ताब्यात देणार होती. मात्र, कोरोनाच्या प्रसारामुळे दिरंगाई झाली. एअर इंडियाच्या ताफ्यातील या विमानात बदल करण्यासाठी त्यांना अमेरिकेत बोईंग कंपनीच्या फॅसिलिट सेंटरमध्ये नेण्यात आले होते. सध्या पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती बोईंग ७४७ या विमानाने प्रवास करतात. मात्र, त्यात आता अत्याधुनिक तंत्रज्ञान बसविण्यात आले आहे.
ऑगस्ट महिन्यात, एअर इंडिया, एअर फोर्स आणि सुरक्षा दलाचे एक पथक विमानासंबंधीची औपचारिकता पूर्ण करण्यास अमेरिकेला गेली होती. मात्र, विमानात तांत्रिक अडचणी आढळून आल्याने डिलिव्हरी लांबणीवर पडली होती. व्हीव्हीआयपी व्यक्तींसाठी असलेले हे विमान एअर इंडिया नाही तर भारतीय हवाई दलाकडून ऑपरेट करण्यात येते असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. B ७७७ हे दुसरे एक विमान काही दिवसांत भारतात दाखल होणार आहे.
मिसाईलविरोधी तंत्रज्ञान
या विमानामध्ये आता अत्याधुनिक तंत्रज्ञान, मिलिटरी डिफेन्स सिस्टीम, कॉन्फिगर्ड केबिन अशा सुविधा आहेत. यामध्ये 'सेल्फ प्रोटेक्शन सुट'सुद्धा असणार आहेत. जर विमानावर मिसाईल हल्ला झाला तरी मिसाईलविरोधी तंत्रज्ञान विमानात बसविण्यात आले आहे.