चेन्नई - इस्रोकडून आतापर्यंत राबवलेल्या अनेक अवकाश मोहिमांमध्ये यश आले आहे. तर काही मोहिमा या अपयशी ठकल्या. मात्र अपयशाने खचून न जाता, त्यातून अनुभव घेत नेमके आपले काय चुकले याचं चिंतन करत भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे मार्गक्रमण सुरू आहे. अपयशी मोहिमांमधून वैज्ञानिकांना नेहमी नव्या गोष्टी शिकायला मिळतात असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांनी शनिवारी सांगितले. ते आयआयटी कांचीपूरमच्या आठव्या दीक्षांत समारंभात बोलत होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की, पहिल्या दोन एएसएलव्ही उपग्रह प्रक्षेपणाला अपयश आले होते. ते आजही आठवत आहे. मात्र आता त्यामधून बोध घेत वैज्ञानिक सातत्याने गुणवत्ता वाढीकडे लक्ष देत आले आहेत. त्यामुळे आपण आज अवकाश संशोधनात जगातील एक प्रमुख देश ठरलो आहोत. 1987 आणि 1988 मध्ये इस्रोकडून आखण्यात आलेल्या दोन्हीही मोहिमा अपयशी ठरल्या होत्या. मात्र तेव्हापासून ते आतापर्यंत काळानुरूप वैज्ञानिकांनी तंत्रज्ञानामध्ये अमुलाग्र बदल केले आहेत. त्याचा फायदा पुढील मोहिमांसाठी झाला. असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान कुठल्याही अपयशाने खचून जाऊ नका, प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी जर आंगी असेल तर जगात कोणतीही गोष्ट अश्यक नाही. संशोधकाची वृत्ती अंगी ठेवा असा सल्ला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.