नवी दिल्ली - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञाला भाजपने दिलेल्या उमेदवारीचा भारतीय कम्युनिष्ट पक्षाने (सीपीआय) निषेध केला आहे. भाजपने साध्वीला भोपाळ मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
प्रज्ञाला उमेदवारी देऊन भाजप आणि आरएसएस धर्माच्या नावावर मतदारांमध्ये ध्रुवीकरण करत आहे, असा आरोप भाकपने केला आहे. हिंदुत्व संघटनांकडून दहशतवाद पसरवला जात नाही, हे सिद्ध करण्यासाठीच भाजपने ही खेळी खेळली असल्याचेही भाकपने म्हटले आहे. एका दहशतवाद्याला उमेदवारी देणे हे राजकीय आणि नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. यातून भाजपचा खरा चेहरा उघड झाला, असे पक्षाने म्हटले आहे.
प्रज्ञा यांचे वक्तव्य व्यक्तिगत आहे असे सांगत भाजप यातून अंग काढू शकत नाही. दहशतवादाविरोधात आमची लढाई आहे असे म्हणणाऱ्या मोदींनी दहशतवादाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या साध्वींना उमेदवारी दिली आहे. यामुळे त्यांच्या दहशतवादाविरोधातील लढाईला काहीच अर्थ राहिला नाही, असे पक्षाने म्हटले आहे.
साध्वींचे वादग्रस्त वक्तव्य -
हेमंत करकरेंना मारून दहशतवाद्यांनी माझे सूतक संपविले, असे विधान काही दिवसांपूर्वीच साध्वींनी केले होते. यावरुन बरेच वादंग निर्माण झाले. यानंतर आज पुन्हा साध्वींनी नवे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मी अयोध्येत गेले होते. मी हे नाकारत नाही. मी बाबरी पाडण्यात सहभाग घेतला. तसेच, मी राम मंदिर आंदोलनातही सहभागी झाले होते असे त्या म्हणाल्या. आम्हाला राम मंदिर बांधण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. राम हेच राष्ट्र आहे आणि राष्ट्र हेच राम आहे असे प्रज्ञा सिंह म्हणाल्या.
मालेगाव स्फोट प्रकरण -
नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 च्या रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी अंजुमन चौक आणि भीकू चौक यांच्यामधील शकील गुड्स ट्रान्सपोर्टसमोर एक स्फोट झाला होता. यात 7 जणांचा मृत्यू झाला होता तर, 101 जण जखमी झाले होते. या स्फोटासाठी एका दुचाकीचा वापर करण्यात आला होता. NIA च्या अहवालानुसार, या दुचाकीची नोंद प्रज्ञा ठाकूर यांच्या नावावर होती. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) हेमंत करकरे यांच्या नेतृत्वात या प्रकरणाची चौकशी केली आणि या दुचाकीचे संबंध सुरत आणि प्रज्ञा ठाकूर यांच्याशी असल्याचे लक्षात आले होते.
दुचाकी आणि प्रज्ञा यांचे कनेक्शन -
ATS चार्जशीटनुसार, प्रज्ञा ठाकूर यांच्याविरोधात सर्वांत मोठा पुरावा दुचाकी त्यांच्या नावावर असणे हा होता. यानंतर प्रज्ञा यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोकोका किंवा MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली. चार्जशीटनुसार, चौकशी अधिकाऱ्यांना मेजर रमेश उपाध्याय आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यातील एक संभाषण मिळाले, ज्यामध्ये मालेगाव स्फोटातील प्रज्ञा यांच्या भूमिकेविषयी उल्लेख होता.