नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाचा प्रसार झाला असून परिस्थिती गंभीर झाली आहे. कोरोनाचा अनेक क्षेत्रांना फटका बसला आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प येत्या डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार होता. मात्र, कोरोनामुळे हा प्रकल्प मुदतीत पूर्ण अपयशी ठरेल. त्यामुळे निविदा उघडण्यास व जमीन अधिग्रहण करण्यास विलंब झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 63 टक्के जमीनेचे अधिग्रहण केले आहे. प्रकल्पासाठीची गुजरातमधील 77 टक्के जमीन , दादर नगर हवेलीमधील 80 टक्के जमीन आणि महाराष्ट्रातील 22 टक्के जमीन लागणार आहे. मात्र, महाराष्ट्रातील पालघर आणि गुजरातमधील नवसारी यासारख्या भागात भूमी अधिग्रहण करण्याबाबत अद्यापही अडचणी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीची आर्थिक आणि तांत्रिक मदत जपान करणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 1,08,000 कोटी एवढा खर्च येणार आहे. जूनपर्यंत प्रकल्पावर 3 हजार 226 कोटी रुपये खर्च झाला आहे.
मागील वर्षी, सार्वजनिक कामांच्या ९ निविदा काढल्या होते. ज्या कोरोनामुळे उघडल्या जाऊ शकल्या नाहीत. कोरोना संक्रमणामुळे आम्हाला टेंडर उघडण्याची तारीख पुढे ढकलावी लागली आहे. कोरोनाचा प्रकल्पावर किती प्रभाव होईल, हे सांगता येणार नाही, असे एनएचएसआरसीएलचे एमडी अचल खरे म्हणाले.