नवी दिल्ली : कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठे पाऊल उचलले आहे. मंत्रालयाच्या नव्या नियमानुसार आता, खासगी डॉक्टरांनाही एखाद्या रुग्णाला कोरोना चाचणीसाठी पाठवण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे कोरोना चाचण्यांवर भर देण्याचा केंद्राचा निर्णय खऱ्या अर्थाने लागू होण्यासाठी मदत होणार आहे. राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञांसोबत झालेल्या एका बैठकीनंतर केंद्राने हा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी, केवळ सरकारी डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवरच कोरोना चाचणीची परवानगी मिळत होती. मात्र, आता खासगी डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवरही कोरोनाची चाचणी करता येणार आहे. आयएमसीआरच्या नियमावलीनुसार एखाद्या रुग्णाला कोरोनाची लक्षणे दिसत असतील, तर खासगी डॉक्टरही त्याला कोरोना चाचणी करण्याचा सल्ला देऊ शकतो.
यासोबतच, केंद्राने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचित केले आहे, की आपापल्या प्रांतामधील कोरोना चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांचा पूर्ण क्षमतेने वापर करुन घ्या. जेणेकरून या निर्णयाचा सामान्य नागरिकांना जास्तीत जास्त उपयोग होईल.
यासोबतच आयएमसीआरने असेही सूचित केले आहे, की सरकारी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचणी ही पूर्णपणे मोफत असावी. तसेच, राज्य प्रशासनाने कोणत्याही व्यक्तीला चाचणीपासून मज्जाव करू नये. आजपर्यंत देशात एकूण ९०,५६,१७३ लोकांच्या कोरोना चाचण्या पार पडल्या असून, लवकरच ही संख्या एक कोटींच्या पुढे जाईल, असेही आयएमसीआरने स्पष्ट केले.
सध्या देशात ७६७ सरकारी आणि २९७ खासगी अशा एकूण १०६५ कोरोना चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा आहेत.
हेही वाचा : सुखोई-30 आणि मिग-29 लढाऊ विमानांसह लष्करी साहित्य खरेदीला हिरवा कंदील