चेन्नई - तामिळनाडूमध्ये एकाच दिवसात कोरोनाचे ७४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४८५वर पोहोचली आहे. तसेच राज्यात आज दोन रुग्णांचा बळीही गेल्याची माहिती समोर येत आहे.
शनिवारी तामिळनाडूच्या विल्लुपूरममध्ये एका ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीने दिल्लीतील मरकज कार्यक्रमाला हजेरी लावल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्याने दिली आहे. यासोबतच, शनिवारी तेनी जिल्ह्यामधील एका ५३ वर्षीय महिलेचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यानंतर राज्यातील एकूण बळींची संख्या तीनवर पोहोचली आहे. राज्यातील पहिला बळी हा मदुराईमधील व्यक्ती होता. एका तबलिगी जमातच्या सदस्याच्या संपर्कात आल्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.
शनिवारी एका दिवसात राज्यात ७४ नवे रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४८५ झाली आहे. शुक्रवारपर्यंत आढळून आलेल्या ४११ रुग्णांपैकी ३६४ रुग्ण तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे. आजच्या रुग्णांपैकी तबलिगी जमातचे किती रुग्ण होते याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.
राज्याच्या आरोग्य सचिव बीला राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे बाराशे व्यक्तींनी दिल्लीतीत मरकज कार्यक्रमाकला हजेरी लावली होती. या सर्वांचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा : कोरोना : आमदारांनी प्रत्येकी एक कोटी रुपये द्यावेत; योगी सरकारचे आवाहन