नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने परत एकदा राज्यसभेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात कोरोना संसर्ग पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. १८ जागांसाठीची ही निवडणूक केव्हा होणार याचा निर्णय परिस्थिती पाहून घेतला जाणार आहे, असे आयोगाने सांगितले आहे.
- 18 जागांसाठी होणार आहे मतदान -
17 राज्यातील 55 जागांसाठी 26 मार्चला मतदान होणार होते. त्यावेळी ही मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता परत एकदा निवडणूकीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 18 मार्चला उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर 37 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. आता 18 जागांवर मतदान होणार आहे. गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि झारखंडमध्ये चुरशीची निवडणूक होण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान, भाजपकडून उदयनराजे भोसले, भागवत कराड आणि मित्रपक्ष रिपाइंचे रामदास आठवले, शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी आणि काँग्रेसकडून राजीव सातव हे बिनविरोध निवडून आले आहेत.