नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सध्यातरी 'नाईट कर्फ्यू' सुरू करण्याचा विचार नाही, असे केजरीवाल सरकारने उच्च न्यायालयात सांगितले. मागील काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट आली असून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरात रात्रीच्या वेळी कर्फ्यू लावण्याची चर्चा सुरू होती. मात्र, आज सरकारने या विषयी न्यायालयात बाजू स्पष्ट केली.
न्यायालयाने केली होती विचारणा
हिमा कोहली आणि एस. प्रसाद यांच्या पीठापुढे सरकारने अर्ज दाखल केला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही राज्यांत पुन्हा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यामुळे दिल्ली कर्फ्यू लागू करणार आहात का? अशी विचारणा २६ नोव्हेंबरला सरकारकडे केली होती. त्यावर आज सरकारने उत्तर दिले.
नागरिकांच्या हालचालींवर सध्या बंधन नाही
वरिष्ठ वकील संदिप सेठी आणि अतिरिक्त वकिल सत्यकम यांनी दिल्ली सरकारची बाजू न्यायालयात मांडली. ३१ डिसेंबरपर्यंत शहरात जैसे थे स्थिती ठेवण्यात येणार असून तसा आदेश जारी केला आहे. नागरिकांच्या हालचालींवर सध्या कोणतेही बंधन घालण्यात आले नाही, असे त्यांनी न्यायाधीशांना सांगितले. दिल्लीत कोरोनाच्या वाढविण्यात याव्यात अशा याचिका दाखल होत आहे. त्यावर आज न्यायालयात सुनावणी झाली.