हैदराबाद - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी भारतात कोविड -19 रुग्णांच्या संख्येत 45,882 एवढी भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 90 लाखांवर पोहोचली आहे. यापैकी 84.28 लाख रुग्ण बरे झाले असून भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 93.6 टक्के एवढा आहे. कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण रुग्णसंख्या 90,04,365 एवढी झाली असून 1,32,162 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासात 584 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत भारतात कोरोनाचे 4,43,794 सक्रिय रुग्ण आहेत.
![covid-19-news-from-across-the-nation](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9608711_svsf.jpg)
नवी दिल्ली- पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी जनतेला विनामुल्य मास्त वाटप करावे, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केले. दिल्ली सरकारने नुकताच सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालण्याऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. त्यासाठीचा दंड 500 रुपयांवर दोन हजार रुपये एवढा केला आहे. तसेच कोविड-19 च्या रुग्णांसाठी दिल्ली सरकारने खासगी रुग्णालयात आरक्षित केलेल्या सामान्य, नॉन-आयसीयू बेडवर सरकारी दर लागू होतील, असे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी शुक्रवारी सांगितले.
मुंबई- महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहतील. मुंबईत कोविड-19 च्या केसेसमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 23 नोव्हेंबरला शाळा सुरू होणार नाहीत, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
भोपाळ- कोविड-19 ची रुग्णसंख्या वाढत असल्याने मध्य प्रदेश सरकारने भोपाळ, इंदूर, रतलाम, विदिशा आणि ग्वालियर या पाच शहरांमध्ये रात्री १० ते सकाळी 6 वाजेपर्यंत नाईटकर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे.
गांधीनगर - कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी गुजरात सरकारने राजकोट, वडोदरा आणि सुरत येथे रात्री 9 ते सकाळी 7 दरम्यान नाईटकर्फ्यू लागू केला असल्याचे जाहीर केले. तसेच दूध व औषधांची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
चंदीगड - कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता. राज्यातील सर्व सरकारी तसेच खासगी शाळा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील, असे आदेश हरियाणा सरकारने दिले आहे.
हेही वाचा- राज्यातील नव्या रुग्णाचा आकडा घसरला; ५,६४० नवीन रुग्णांचे निदान तर १५५ रुग्णांचा मृत्यू