हैदराबाद - देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दिसेंदिवस वाढतच आहे. मागील 24 तासात देशभरात 74 हजार 442 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 902 जणांचा मृत्यू झाला. एकुण रुग्णसंख्या 66 लाख 23 हजार 815 वर पोहोचली असून आतापर्यंत 1 लाख 2 हजार 685 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. भारताचा रिकव्हरी रेट 84.3 टक्यांवर आहे.
![COVID-19 news from across the nation](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9064223_454_9064223_1601930121014.png)
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत 2 हजार 700 कंटेन्मेंट झोन तयार झाले होते. रविवारी कंटेन्मेंट झोनची संख्या वाढून 2 हजार 707 वर पोहोचली आहे. आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, कंटेन्मेंट झोनची संख्या वाढविणे हा विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीचा एक भाग आहे. आम्ही चाचण्यांची संख्या तीनपट वाढवली आणि छोटे कंटेन्मेंट झोन तयार करून पॉझिटिव्ह रुग्णांना त्याठिकाणी ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्र
मुंबई - सोमवारी महाराष्ट्रात रेस्टॉरंट्स आणि बार पुन्हा सुरू झाले. त्यामुळे उद्योजकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच इतरही गोष्टी महिन्याभरात हळूहळू सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
उत्तर प्रदेश
लखनौ - माजी केंद्रीय मंत्री लोकसभा सदस्य रशीद मसूद यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते 73 वर्षाचे होते. त्यांच्यावर दिल्लीतील रूरकी रुग्णालयात उपचार सुरू होते.
बंगळुरू - शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने ते स्वत: गृह विलगीकरणात आहे. ट्विटरवर त्यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही, डॉक्टरांच्या सल्लाने उपचार सुरू आहेत. कुमार नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत उपस्थित होते.
हिमाचल प्रदेश
डेहराडून - हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर तीन दिवस गृह विलगीकरणात राहणार आहेत. 3 ऑक्टोंबरला मनाली येथे भेटलेली एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
जम्मू - काश्मीर
श्रीनगर - जम्मू-काश्मीर प्रदेश कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष जी. ए. मीर यांनी सोमवारी केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या कोरोना परिस्थितीबद्दल दिलेल्या प्रतिक्रियेवर टीका केली. आणि आरोग्य यंत्रणेवरील लोकांचा आत्मविश्वास परत करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची मागणी केली.