हैद्राबाद - अॅस्ट्राझेनेका या कोविड लस निर्माण करणाऱ्या कंपनीने लसीची चाचणी प्रक्रिया थांबवली आहे. ब्रिटनमधील एका स्वयंसेवकाला या लसीमुळे अज्ञात आजार झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. मात्र, भारतातील १०० स्वयंसेवकांनी या लसीची दुसरा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. त्यांच्यावर अद्याप या लसीमुळे कोणतेही दुष्परिणाम झालेले नाहीत.
पुण्यातील सिरम इस्टीट्यूट ऑफ इंडीया ही जगातील लस निर्माण करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. याच कंपनीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेनर इस्टीट्यूट आणि अॅस्ट्राझेनेका या कंपनीसोबत या लसीबाबत करार केला होता. विशेष म्हणजे भारतात या लसीचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नसल्याने चाचण्यांचा पुढचा टप्पा करण्यात येईल अशी, माहिती सिरम इस्टीट्यूटने दिली आहे.
इंदूर - सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवणाऱ्या तीन भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. जिल्ह्यात होणाऱ्या २७ जागांच्या निवडणुकीसाठी भव्य मिरवणूक काढण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
३ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या मिरवणुकीत हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. २ हजार ४०० कोटी रुपयांचा खर्च करून निर्माण करण्यात आलेल्या नर्मदा सिंचन प्रकल्पाच्या उद्धाटनापुर्वी ही मिरवणूक काढण्यात आली होती. या प्रकल्पामुळे जवळपास २५० गावांना फायदा होणार आहे. दरम्यान, राज्याचे माजी आरोग्यमंत्री अनूप मिश्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे.
रायपूर - २ हजार ५४५ नवीन कोरोनाबाधितांच्या नोंदीनंतर राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांच्या पार गेला आहे. राज्यातील एकूण बाधितांचा आकडा ५० हजार ११४ वर पोहचला आहे. पैकी राज्यात २६ हजार ९१५ सक्रिय रुग्ण असून ४०७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात दहा लाख लोकसंख्येमागे २४ हजार ३८८ नागरिकांची कोरोना तपासणी केली जाते. तसेच राज्यात संक्रमणाचा दर ६% असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
रांची - जिल्ह्यात मंगळवारपासून कोरोना बाधितांच्या वर्गीकरणासाठी 'डोअर टू डोअर' मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरातील कंन्टेनमेंट क्षेत्रात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. दरम्यान, २ हजार ६५२ नवीन कोरोनाबाधितांच्या नोंदीनंतर राज्यातील बाधितांचा आकडा ५५ हजारांच्या पार गेला आहे. तर १९ नवीन मृत्यूसह मृतांचा एकूण आकडा ५०३ वर पोहचला आहे.
भुवनेश्वर - ३ हजार ७४८ नवीन कोरोनाबाधितांच्या नोंद आणि ११ मृत्यूनंतर राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आणि एकूण मृतांच्या संख्या अनुक्रमे १ लाख ३५ हजार १३० आणि ५८० वर पोहचली आहे. तर राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पैकी राज्यात ३२ हजार ३१२ सक्रीय रुग्ण असून १ लाख २ हजार १८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.