हैदराबाद - मागील २४ तासांमध्ये देशभरात ३७,१४८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तसेच ५८७ रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ११,५५,१९१ वर पोहोचली आहे. तसेच, बरे झालेल्यांची संख्या ७.२ लाखांवर, आणि उपचाराधिन रुग्णांची संख्या चार लाखांच्या पुढे गेली आहे. दरम्यान, देशभरात कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीसाठी लोकांची नोंदणीही सुरू करण्यात आली आहे.
कोरोनासंबंधी राज्यनिहाय ठळक घडामोडी..
दिल्ली..
- नवी दिल्ली : जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिल्लीतील २३ टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. राजधानीमधील ११ जिल्ह्यांमधून २० हजार लोकांचे सर्वेक्षण करुन हा अहवाल सादर करण्यात आला. कोरोनाची लागण झालेल्या लोकांपैकी बरेच लोक हे असिम्प्टोमॅटिक म्हणजेच कोणतीही लक्षणे न दिसणारे आढळले आहेत. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि दिल्ली सरकार यांनी संयुक्तपणे हे सर्वेक्षण केले.
महाराष्ट्र..
- मुंबई : राज्यातील पुण्यामध्ये एका ३० वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला गृह-विलगीकरणात राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही ती मुंबईहून एका विशेष विमानाने दुबईला गेली होती. त्यामुळे विलगीकरणाचे नियम मोडल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - राज्यात आज आठ हजार नव्या रुग्णांसह २४६ मृत्यूंची नोंद; तर सात हजार रुग्णांना डिस्चार्ज..
तेलंगाणा..
- हैदराबाद : सेंट अँड्र्यूज स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेची फी कमी करण्याच्या संदर्भात आंदोलन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. मात्र, तरीही शाळेकडून नेहमीप्रमाणे फी आकारली जात आहे. तसेच, फी न दिल्यास मुलांना ऑनलाईन वर्गांमध्ये बसू दिले जाणार नसल्याचा इशारा शाळेने दिला आहे, असा आरोप पालकांनी केला आहे.
मध्य प्रदेश..
- भोपाळ : मध्यप्रदेशच्या राईसेन जिल्ह्यातील बरेली सब-जेलमध्ये असणाऱ्या ८२ कैद्यांपैकी ६७ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासोबतच, तीन गार्ड्सही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, सरकारने राज्यातील १७ ठिकाणी पाच दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ओडिशा..
- भुवनेश्वर : राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी नव्या कोरोना रुग्णालयांसाठी आणि कोविड केअर सेंटर्ससाठी मुख्यमंत्री मदत निधीमधून २०.६४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. खुर्दा आणि कटक जिल्ह्यांमध्ये ही रुग्णालये आणि केअर सेंटर उभारण्यात येणार आहेत.
उत्तर प्रदेश..
- लखनऊ : गेल्या २४ तासांमध्ये राज्यातील एकट्या कानपूर जिल्ह्यात २०१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कानपूर हे राज्यातील मोठे हॉटस्पॉट झाले आहे. सोमवारीही कानपूरमध्ये एका दिवसातील सर्वोच्च (२३०) रुग्णांची नोंद झाली होती.
झारखंड..
- रांची : झारखंडच्या धनबादमध्ये एकाच कुटुंबातील सहा लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये ८८ वर्षांच्या वृद्धेसह तिच्या पाच मुलांचा समावेश आहे. चार जुलै ते २१ जुलै या कालावधीमध्ये या सर्वांचा मृत्यू झाला. यामुळे धनबादमध्ये खळबळ उडाली असून, जिल्हा प्रशासनाने लोकांना लॉकडाऊनचे नियम गांभीर्याने पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, धनबादची पश्चिम बंगालला लागून असलेली सीमा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.