हैदराबाद : देशभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. देशातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असली, तरीही रुग्णांच्या संख्येवर मात्र आपल्याला अद्याप नियंत्रण आणता आले नाही, असेच दिसत आहे. कोरोनाचा आपल्या दैनंदिन जीवनावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला आहे. पाहूयात, देशभरातील कोरोनासंबंधी काही महत्त्वाच्या घडामोडी...
- नवी दिल्ली -
दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये आता रुग्णांना केवळ १५ मिनिटांमध्ये दाखल करुन घेतले जाणार आहे. शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, केजरीवाल सरकारने रुग्णालयांना याबाबत निर्देश दिले आहेत. यासोबतच, दाखल करुन घेतल्यानंतर एका तासाच्या आत त्या रुग्णाची तपासणी एखाद्या डॉक्टरने करणे आवश्यक आहे. तसेच, रुग्णांच्या गरजेनुसार रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करुन द्याव्यात असेही निर्देश रुग्णालयांना देण्यात आले आहेत.
- महाराष्ट्र -
राज्याचे मुख्यमंत्री लॉकडाऊन वाढवणार आहेत, असा समज झाल्यामुळे ठिकठिकाणी लोकांनी खरेदीसाठी आणि इतर गोष्टींसाठी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे असे काहीही होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे कोरोना पॉझिटिव्ह ठरलेले राज्यातील तिसरे मंत्री ठरले, यापूर्वी अशोक चव्हाण आणि जितेंद्र आव्हाडांनाही कोरोनाची लागण झाली होती.
शनिवारपासून जगप्रसिद्ध असलेल्या 'वारी'ची सुरुवात होणार आहे. शनिवारी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि इतर संतांच्या पादुका या आळंदीमध्ये एकत्र आणल्या जातील. या पार्श्वभूमीवर शहरात कलम १४४ लागू करण्यात आले असून, या सोहळ्याला केवळ ५० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
तर ठाण्यामध्ये सुमारे ५० ते ६० जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या सर्वांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या मृतदेहाला आलिंगन दिले होते.
- कर्नाटक -
तोर्नागल्लूमधील जिंदाल स्टील कारखाना आणि त्याच्या वसाहतीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. खबरदारी म्हणून सुमारे १० हजार कामगारांना गृह-विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. गेल्या नऊ दिवसांमध्ये विद्यानगर, व्हीव्ही नगर, शंकरगुड्डा कॉलनी, तोर्नागल्लू गाव, तारानगर, तालुरू, वड्डू आणि बासापूर याठिकाणी असलेल्या जिंदाल वसाहतींमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या वसाहतींमधील २० भाग आणि आजूबाजूची काही गावे सील करण्यात आली असून, डोअर-टू-डोअर चाचणी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, हावेरी गावात कोरोनाच्या भीतीने एका व्यक्तीचे अंतिम संस्कार करण्यासाठी एकही नातेवाईक पुढे आला नाही. त्यामुळे गावचे पंचायत प्रमुख आणि पंचायत विकास अधिकारी यांनीच पीपीई किट घालून त्यावर अंत्यसंस्कार केले. ५१ वर्षांच्या हाच्चप्पा गोणी यांचा मृत्यू यकृताच्या आजारामुळे झाला होता, तसेच त्यांचा कोरोना अहवालही निगेटिव्ह आला होता.
- गुजरात -
अहमदाबादमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना शेजारच्या जिल्ह्यांमध्ये उपचारांसाठी हलवण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी याबाबत निर्णय जाहीर केला. गेल्या १० दिवसांपासून शहरात दररोज सुमारे ३०० रुग्ण आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, माजी केंद्रीय अर्थ सचिव हसमुख अधिया यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला. कोविड-१९ नंतरच्या काळात राज्याच्या अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन कसे करता येईल, याबाबत हा अहवाल आहे.
- हिमाचल प्रदेश -
राज्यातील सर्व गरोदर महिलांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या महिलांना कोरोनाची लक्षणे असो-वा नसो, त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. एखाद्या महिलेच्या प्रसूती तारखेच्या एक आठवड्यापूर्वी तिची कोरोना चाचणी केली जाईल, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्य सरकारने काही नियमांसह हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरीही काही हॉटेल मालकांनी सप्टेंबरपर्यंत आपली सेवा बंद ठेवण्याचा निर्णय एकत्रितपणे घेतला आहे. याचा राज्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होणार आहे.
- उत्तराखंड -
पतंजली आयुर्वेद कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्णा यांनी कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला आहे. कोरोना लसीचे क्लिनिकल अहवाल हाती आले आहेत. दरम्यान, क्लिनिकल कंट्रोल अहवालाची वाट पाहत आहोत. त्यानंतर जागतिक मानकांत पात्र ठरल्यानंतर कोरोनावर अधिकृत लस शोधल्याचे घोषित करण्यात येईल, असे बालकृष्णा यांनी सांगितले.
- मध्य प्रदेश -
इंदोर आणि भोपाळच्या हॉटस्पॉट भागांमध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि भोपाळ एआयआयएमएस यांचे संयुक्त पथक सेरो-सर्वेक्षण करणार आहे. यामध्ये प्रथम कोविड योध्ये, म्हणजेच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे, त्यानंतर सामान्य नागरिकांची तपासणी होणार आहे.
यामध्ये लोकांच्या ब्लड-सेरमची तपासणी करण्यात येणार आहे. जेणेकरून कोरोनाच्या प्रसाराचा टप्पा ओळखता येईल, आणि लोकांमध्ये कलेक्टिव इम्युनिटी तयार झाली आहे का, याची पाहणी करता येईल.
- हरियाणा -
राज्यातील सर्व शाळा थेट १५ ऑगस्टनंतर उघडण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे.
- बिहार -
एक ते ११ जूनदरम्यान राज्यात एकूण २,१४१ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ६,०४३वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत ३५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- झारखंड -
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारपर्यंत राज्यात १,६०७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. खबरदारी म्हणून सुमारे ५५ हजार लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
राज्याच्या सिमडेगा आणि पूर्व सिंघभूम भागामध्ये आतापर्यंत सर्वाधिक रुग्णा आढळले आहेत. तर, गोड्डा भागामध्ये आतापर्यंत केवळ एका रुग्णाची नोंद झाली आहे.
- छत्तीसगड -
राज्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, वा चेहरा झाकणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा नियम मोडल्यास, १०० रुपये दंड भरावा लागणार आहे.